वसतीगृह सुरु ठेवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसतीगृह सुरु ठेवण्याची मागणी
वसतीगृह सुरु ठेवण्याची मागणी

वसतीगृह सुरु ठेवण्याची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १० : वाढत्या कोरोनाच्या आणि ओमिक्रोनच्या प्रार्दभावामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात वसतीगृह देखील बंद केली जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांना घराकडे परतावे लागणार आहे. हे परवडणारे नसून वसतीगृह सुरु ठेवावेत, अशी मागणी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी सरकारच्या स्वाधार योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.
समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी ग्रामीण, दुर्गम भागातून आणि गरीब परिस्थितीतून आलेली आहेत. त्या विद्यार्थ्यांना गावी परत जाणे परवडणारे नाही. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधांचा अभाव आहे. यामध्ये वीज समस्या, नेटवर्क समस्या, पाणीटंचाई प्रश्‍न, दर्जेदार पुस्तके आणि वर्तमानपत्रे यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. या व इतर अनेक समस्यांचा विचार करता विद्यार्थी गावाकडे राहून ऑनलाइन शिक्षण घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात, असे गणेश पंडित या विद्यार्थ्याने सांगितले.
सुमारे दीड वर्षानंतर सरकारने ६ डिसेंबर २०२१ पासून पुण्यातील वसतिगृहे सुरू झाली आहेत. दीड वर्षामध्ये ऑनलाइन शिक्षणामुळे नुकसान झाले आहे. विद्यार्थी नव्या उमेदीने नुकतेच अभ्यासाला लागले होते. आता पुन्हा ऑनलाइन शिक्षण आणि वसतिगृह बंदची घोषणा होताच अवघ्या महिनाभरातच गावाकडे परतण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. त्यामुळे सरकारने आमचे आधीच नुकसान झालेले असताना अधिक करू नये. जरी महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने बंद असली, तरी ती ऑनलाइन सुरूच आहेत. वसतिगृहामध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे योग्य काळजी घेते येऊ शकते, असे प्रदिप भंडारे या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.

मोठया संख्येने मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी पुण्यातील वसतीगृहांमध्ये राहत आहेत. आमची आधीच परिस्थिती नाही. त्यात शिक्षण ऑनलाइन झाले तर खर्च वाढतो. कोरोनाचे संकट आहे हे मान्य आहे. परंतु प्रत्येक वेळी वसतिगृह बंद करणे हा उपाय असू शकत नाही.
- कुणाल माने, विद्यार्थी

वसतिगृह गेले दीड वर्ष बंद होते, मात्र सरकारने कधी विद्यार्थ्यांचा विचार केला नाही. स्वाधार योजनेचे पैसे देखील खात्यावर जमा केले नाहीत. या योजनेचे दोन वर्षांपासून प्रति वर्ष एक लाख रुपये प्रमाणे सरकारने विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. अन्यथा एकही विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर पडणार नाही.
- मारोती गायकवाड, महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधी

या आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या
- अनेक विद्यार्थी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील
- कोरोनामुळे घरची परिस्थिती आर्थिक संकटात सापडल्याने मानसिक तणाव वाढला आहे
- अनेकदा पालकांकडून विद्यार्थ्यांना रोजंदारीवर, मजुरीवर पाठविल्या जाते, त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याची शक्यता
- या जागतिक महामंदीच्या काळात सर्वांनाच मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे, त्यामुळे वसतिगृह बंद होताच कुटुंबाकडून पुढील शिक्षणास विरोध होण्याची शक्यता आहे.
- विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारखे साधने उपलब्ध नाहीत. शिवाय काही विद्यार्थ्यांकडे मोबाईलही नाही त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ गावाकडे राहून घेता येणार नाही

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top