इंग्रजांकडील जीवाश्म नोंदीच पूर्वग्रहदूषित उत्क्रांती संशोधनावर परिणाम; पाच देशांतील शास्रज्ञांचा शोधनिबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजांकडील जीवाश्म नोंदीच पूर्वग्रहदूषित
उत्क्रांती संशोधनावर परिणाम; पाच देशांतील शास्रज्ञांचा शोधनिबंध
इंग्रजांकडील जीवाश्म नोंदीच पूर्वग्रहदूषित उत्क्रांती संशोधनावर परिणाम; पाच देशांतील शास्रज्ञांचा शोधनिबंध

इंग्रजांकडील जीवाश्म नोंदीच पूर्वग्रहदूषित उत्क्रांती संशोधनावर परिणाम; पाच देशांतील शास्रज्ञांचा शोधनिबंध

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः इंग्रजांसह युरोपातील साम्राज्यवादी देशांनी भारतासारख्या वसाहतींचे केवळ आर्थिक आणि सामाजिक शोषण केले नाही; तर येथील ऐतिहासिक पुरावेही पूर्वग्रहदूषित मानसिकतेने मांडल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वसाहतवादी आणि आर्थिक बलाढ्य महासत्तांनी घेतलेल्या जीवाश्मनोंदी या पक्षपाती, अपूर्ण व विषम असल्याचे जीवाश्मशास्त्रज्ञांच्या संशोधनातून पुढे आले आहे. भारतासह जर्मनी, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील येथील जीवाश्मशास्त्रज्ञांचे हे संशोधन नेचर इकॉलॉजी अँड इव्हॉल्यूशन या शोधपत्रिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहे.

संशोधनात सहभागी झालेल्या पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. देवप्रिया चट्टोपाध्याय ‘सकाळ’शी बोलताना म्हणाल्या, ‘‘जीवाश्मनोंदीद्वारे पृथ्वीवरील प्राचीन जैविक उत्क्रांतीचा व पर्यावरणानुसार होणाऱ्या बदलांचा पुरावा उपलब्ध करून देतात. पण युरोप आणि उत्तर अमेरिकेतील प्रबळ, प्रगत वसाहतींच्या पक्षपातामुळे जगभरातील जीवाश्मनोंदी अपूर्ण व विषम पद्धतीने होतात. यामागे केवळ भौगोलिक नाही तर ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक घटकांचासाही समावेश आहे.’’ पक्षपाती जीवाश्मनोंदीमुळे संशोधनाचे निष्कर्षही चुकीचे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि प्राचीन पुराव्यांची अचूकता तपासणे संशोधकांसाठी मोठे आव्हान आहे.

निष्कर्ष ः
- आजवरचे ९७ टक्के जीवाश्मशास्त्रीय संकलन युरोप, उत्तर अमेरिकेतील संशोधकांचे
- हे संशोधन करताना स्थानिक तज्ज्ञांना विचारात न घेता एककल्ली निष्कर्ष
- विकसनशील देशांतील जीवाश्मांचा वैज्ञानिक माहितीसाठी वापर होतो, मात्र त्यासंबंधीचे ज्ञान व अधिकार सधन देशांकडे
- पारतंत्र्याच्या काळातील अनेक देशांतील जीवाश्म संकलने पूर्वग्रहदूषित किंवा पक्षपाती
- म्यानमार, मंगोलिया, चीन व ब्राझील या देशांत जीवाश्मांची तस्करी

उपाय काय?
- सापडलेले जीवाश्म नमुने मूळ देशांकडे सुपूर्द करावे
- स्थानिक संशोधकांच्या मदतीने न्याय, नैतिक आणि दीर्घकालीन सामंजस्य करार
- आर्थिक बलाढ्य देशांनी स्थानिकांच्या भागीदारीसह संशोधनासाठी आर्थिक निधीचे संकलन करावे
- जीवाश्मांच्या संवर्धनासाठी विकसनशील अथवा अविकसित देशांनी संग्रहालये उभी करावीत
- वसाहतवादी मानसिकता संपुष्टात आणत सर्वसमावेशक संशोधन पद्धती अवलंबावी

जागतिक हवामान बदलाचा परिणाम हा जीवाश्मांच्या माध्यमातून अभ्यासण्यात येतो. मात्र, उपलब्ध जीवाश्मनोंदीच पक्षपाती आहेत. त्यामुळे या संशोधनात अनेक अडचणी निर्माण होत आहे. वसाहतवादी समुहांकडे असलेल्या या नोंदी निर्दोष आणि अचूक असणे गरजेचे आहे.
- डॉ. देवप्रिया चट्टोपाध्याय, पृथ्वी आणि हवामान विज्ञान विभाग, आयसर, पुणे

उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शास्त्रज्ञ निष्कर्षापर्यंत पोचतात. जर मूळ पुरावेच पक्षपाती असतील तर निष्कर्षही चुकतीलच. वसाहतवादी देशांकडे असलेले केवळ जीवाश्म नाही तर ऐतिहासिक धरोहरही मूळ देशांकडे सुपूर्द करावे लागतील. यासाठी युनेस्कोने पुढे येत पावले उचलावी.
- डॉ. वसंत शिंदे, ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ, माजी कुलगुरू, डेक्कन कॉलेज

फोटो ः PCT22B08874

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top