पुण्यात उन्हाळ्यात पाणीकपात नाही शेती सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात उन्हाळ्यात पाणीकपात नाही
शेती सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
पुण्यात उन्हाळ्यात पाणीकपात नाही शेती सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

पुण्यात उन्हाळ्यात पाणीकपात नाही शेती सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : शहरामध्ये उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात येणार नाही. शिवाय, जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, खडकवासला प्रकल्पात सध्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. उन्हाळी पिकांसाठी आवर्तन आणि शहरातील पाण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संजय चोपडे आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे शहरासाठी राखीव पाणीसाठ्यापेक्षा अधिक पाणी महापालिका घेते. परंतु, पाण्याचा काटकसरीने वापर करावा. कालव्यांमधून गळतीची ठिकाणे शोधून ती थांबविण्याच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घ्याव्यात. कालवा अस्तरीकरणाची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि गतीने करावीत. नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. नीरा प्रकल्पातून रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन तसेच, खडकवासला प्रकल्पातून रब्बीचे एक आणि दोन उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावेत. शहरातील पिण्याच्या आणि ग्रामीण भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. कामे खराब आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्यायादीत टाकण्यासह अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

भामा-आसखेड धरणामधून जेवढे पाणी घेतले जात आहे, तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पामधून कमी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत. कामे होतील त्यानुसार खडकवासलामधून पाणी कमी करू, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. आळंदीला दोनशे दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणीकोटा मंजूर करावा, असे महापालिकेने स्पष्ट केले.

या बैठकीस आमदार समाधान आवताडे, शंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, नीरा-भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, सांगोला साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, पाणीवापर संस्था प्रतिनिधी सुरेश पालवे-पाटील आदी उपस्थित होते.

‘पवनेतील पाण्यापासूनची वीजनिर्मिती थांबवणार’
मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाण्यापासून वीजनिर्मिती केली जात आहे. यामुळे या धरणाच्या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी कमी पडू लागले आहे. पण सध्या वीजनिर्मितीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे यापुढे पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याची गरज नाही. त्यामुळे येथील वीजनिर्मितीला पर्याय शोधून, या धरणातील पाणी वाचविण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती येत्या महिनाभरात राज्य सरकारला अहवाल देईल. या अहवालातील शिफारशींवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खडकवासला प्रकल्पातून शेतीला आवर्तने देताना शहराची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, ही आमची भूमिका होती. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले, याचे समाधान आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुरेसे पाणी मिळणे आवश्यक होते. पाणीगळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. शिवाय समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महापालिका

पुणे महापालिकेने अधिकचे पाणी वापरल्यामुळे सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. कालव्याच्या अखेरपर्यंतच्या भागात कमी दाबाने आणि कमी काळ पाणी राहते. त्यामुळे महापालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार पाणीवापर करावा.
- दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top