''पुणे जिल्ह्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळ''

''पुणे जिल्ह्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळ''

पुणे, ता. १५ : पुणे जिल्ह्यात याआधी प्रस्तावित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होईल. पण ते नेमके कोणत्या ठिकाणी होईल, त्याची जागा कोणती हे आताच सांगणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.१५) पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शहर व जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर ते होते. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे विमानतळ होणार की नाही, असा लोकांमध्ये संभ्रम आहे, असा प्रश्‍न पवार यांना विचारला असता त्यांनी हा निर्वाळा दिला आहे.
पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्‍यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरणही जाहीर केले आहे.

प्रस्तावास तांत्रिक अडचणी
खेड तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या विमानतळाला जमिनी देण्यास प्रथमपासून तीव्र विरोध सुरू केला आहे. या विरोधामुळे तेथील जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी काही अंशी जागा बदलण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला होता. परंतु हा प्रस्ताव तांत्रिक अडचणीमुळे अद्याप मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ जागेअभावी होणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


काहीही झाले तरी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होईल आणि याचा फायदा नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातरा, सोलापूर आदी जिल्ह्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना होऊ शकेल.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com