उद्योग क्षेत्रात देशाचे नेतृत्व महाराष्ट्र करेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
उद्योग क्षेत्रात देशाचे नेतृत्व महाराष्ट्र करेल

उद्योग क्षेत्रात देशाचे नेतृत्व महाराष्ट्र करेल

पुणे - महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराज, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने अनेक उद्योजक शून्यातून उभे राहिले. अनेक उद्योजक कुठलीही पार्श्वभूमी नसताना अभ्यास, जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर उभे राहिले. देशाला दिशा देण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशाचे नेतृत्व करू शकतो. आपण सर्व उद्योजकांच्या प्रयत्नांतून मजबूत अर्थव्यवस्था उभी करू, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी येथे व्यक्त केला. ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने ‘ब्रँडस ऑफ महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत राज्यातील ६३ उद्योजकांचा गुणगौरव ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला शुभ संदेश दिला.
पवार म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. शून्यातून कर्तृत्वाचे डोंगर उभे करणारे अनेक उद्योजक महाराष्ट्रात होऊन गेले. यशवंतराव चव्हाण यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले. शेतीबरोबर उद्योगाचा वर्ग कसा तयार करता येईल व त्यासाठी काय मदत करता येईल, यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. एमआयडीसी, सिडको, म्हाडा यांसारखी महामंडळे उभी केली. महाराष्ट्राच्या उभारणीत ही महामंडळे उपयुक्त होती. हे करताना राजकीय धोरण त्यांनी कधी ठेवले नाही. महाराष्ट्र उभारणीची सुरूवात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे झाली. वसंतराव नाईक यांनाही ११ वर्षे मिळाली, आम्ही सर्वांनी योगदान दिले.’’

काही कर्तृत्ववान उद्योजक या राज्यात आधीच होती. त्यांचा आदर्श आणि वारसा अनेकांनी जपला. सोलापुर येथील कापडाचे व्यापारी वालचंदशेठ यांनी इंदापूर तालुक्यातील एका खेड्यात गुळाऐवजी साखरेचा कारखाना उभा केला. अनेक प्रकारची कारखानदारी त्यांनी दूरदृष्टी व कष्टाच्या जोरावर उभी केली. त्यांच्या कष्टाचे कौतुक वाटते, त्यांनी कापड व्यापार करतानाच बंगलोर येथे विमान निर्मिती बनविणारी कंपनी उभी केली. राजर्षी शाहू महाराज यांनी शंतनू किर्लोस्कर यांना नांगराचे फाळ बनविण्यासाठी तोफ दिली. बी. जी. शिर्के यांनी बालेवाडी क्रीडा संकुल आव्हान स्वीकारून सहा महिन्यात उभे केले. ते ही सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्या गावातून आलेले. शिर्के यांच्यासारखे अनेक उद्योजकांनी पार्श्वभूमी नसताना कष्ट, जिद्द, चिकाटीच्या जोरावर उद्योग उभे केले. मुंबई आता उद्योगनगरी न राहता सेवा देणारी नगरी झाली आहे, असे पवार यांनी सांगितले. मुंबईत बिकेसी येथे
प्रयत्नपूर्वक अर्थ केंद्र व हिरे उद्योगाचे केंद्र उभे केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘सकाळ’चे संचालक-संपादक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. भूषण करंदीकर आणि वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.

‘सकाळ’च्या कार्याने तरुणांना प्रेरणा
पिंपरी-चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण यांनी जाणीवपूर्वक औद्योगिक वसाहत उभी केली व त्या ठिकाणी जेआरडी टाटा यांना निमंत्रित केले. मगरपट्टा सिटी येथे एक लाख कामगार काम करतात. कर्तृत्ववान उद्योजक उभे राहिल्याने आयटी क्षेत्रात महाराष्ट्र काम करू शकला. महाराष्ट्र साखरेचे उत्पादन करणारे एकमेव राज्य आहे. उसापासून साखरेबरोबर इथेनाॅल, वीज निर्मिती करू लागलो. चितळे यांचे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात देशात नाव पोचले. त्यांचे अनुकरण अनेकांनी केले. अॅग्रोबेस उद्योगही पुढे आले आहेत. ज्या उद्योजकांचे कर्तृत्व आहे, त्यांचे कौतुक, सन्मान होणे गरजेचे आहे. हे काम ‘सकाळ’ने केले आहे. तुमच्या कार्याची अन्य तरुण प्रेरणा घेतील आणि देशाला दिशा मिळेल, असा आशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top