‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ उपक्रम पुढे न्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ उपक्रम पुढे न्यावा
‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ उपक्रम पुढे न्यावा

‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ उपक्रम पुढे न्यावा

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : औद्योगिक, सेवा, शिक्षण, वैद्यकीय यासह सर्व क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पायाभूत सुविधा, योग्य प्रशासकीय निर्णय आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता असलेल्या उद्योजकांमुळे महाराष्ट्र घडला. तसेच इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे. विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण झालेली असताना यामध्ये ‘सकाळ’ने कायमच पूरक भूमिका घेऊन राज्याच्या विकासाला हातभार लावला आहे. यापुढेही उद्योजकांना, तरुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी ‘सकाळ’चा ‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ उपक्रम पुढे न्यावा अशा शब्दात राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. यातील महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, कृषी, अभियांत्रिकी, बांधकाम आदी विविध क्षेत्रातील ६३ ब्रँड्सचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुक्ष्म, लघु व मध्यम खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला.
महाराष्ट्राच्या स्थापनेला ६१ वर्ष झाले असताना, राज्याच्या प्रगतीला येथील उद्योग, व्यवसायांनी मोलाचा हातभार लावला आहे. देशात सक्षम व विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला घडविण्यासाठी अनेक ब्रँड्सचे मोलाचे योगदान आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात हिमतीने उद्योग उभारून, रोजगार देऊन स्वतःसह अनेकांच्या जीवनाचा उत्कर्ष केला, अशा ६३ उद्योजक, संस्थांचा सन्मान रविवारी ‘सकाळ’ने केला.
सकाळने सामाजिक क्षेत्रात मोठे काम उभे केले. त्याच पद्धतीने ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या उपक्रमातून राज्यातील कानाकोपऱ्यातील उद्योजकांना एक व्यासपीठ देऊन त्यांची नव्याने ओळख राज्याला करून दिली. उद्योजक व्यवसायी यांनी उभ्या केलेल्या संस्था आदर्श पद्धतीने काम करत असल्याचे समाजासमोर मांडून तरुणांना प्रेरणा देण्यासाठी प्रयत्न केले. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीचा आलेख मांडताना ‘सकाळ’च्या या उपक्रमाची विशेष दखल घेतली.
देशातील स्टार्ट अप इकोसिस्टीम मध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. उद्यमशीलता आणि कल्पकता याचा समन्वय साधून तरुण या क्षेत्रात दमदारपणे पाऊल ठेवत आहेत. अशावेळी या तरुणांना योग्य दिशा दाखवण्यासाठी ‘सकाळ’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. यातून आणि त्यावरून प्रेरणा घेऊन शून्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरित होतील, अशा शब्दात मान्यवरांनी ‘सकाळ’ची भूमिका आणि उपक्रमाचे कौतुक केले.

कौतुकाची थाप ठरली प्रेरणादायी
नवकल्पनाद्वारे समाजासाठी काहीतरी वेगळं करू पाहण्याची क्षमता असलेल्या नवउद्योजकांना कौतुकाची थाप मिळणे हे त्यांच्यासाठी प्रेरणादायी असते. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’च्या माध्यमातून केलेला हा गौरव आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आपण काहीतरी चांगले काम करीत असल्याची पावती या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. तसेच या कौतुकामुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देखील मिळाली आहे, अशी भावना गौरव झालेल्या ब्रँड्सने व्यक्त केली. राज्याच्या जडणघडणीत तसेच अनेकांना रोजगार उपलब्ध करीत असलेल्या या ब्रँड्सचा सातत्याने गौरव होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा देखील यावेळी या महाब्रँडचा सन्मान मिळालेल्या व्यावसायिकांनी व्यक्त केली. योग्य नेतृत्व आणि निर्णय क्षमता असेल आणि बाजारपेठेचा आवाका घेता आला तर व्यवसाय सोपा होतो. हे देखील नवउद्योजकांना या माध्यमातून समजेल असे मत पुरस्कारार्थीनी मांडले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top