
सृष्टी संस्थेच्या ‘चावडी’चे उदघाटन
पुणे, ता. १३ : ‘‘विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यावेसे वाटेल, असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी ही शिक्षण व्यवस्थेची आहे. शिक्षणाबाबत आगामी काळातील निर्णय घेताना, धोरण ठरविताना सर्व पातळीतील विद्यार्थ्यांचा विचार करण्याची गरज आहे. तसेच कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना विद्यार्थ्यांवर शिक्षणाचे जीवनदर्शी संस्कार केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात,’’ असे मत बाल शिक्षण मंचाचे संस्थापक अध्यक्ष अमर पोळ यांनी व्यक्त केले.
विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्तींच्या कार्याची समाजाला ओळख करून देण्यासाठी सृष्टी संस्थेच्या वतीने ‘चावडी’ हे नवे व्यासपीठ सुरू केले आहे. या व्यासपीठाच्या उद्घाटनानिमित्त अमर पोळ यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक प्रशांत कोठडिया यांनी पोळ यांच्याशी संवाद साधला. या वेळी पोळ यांनी ‘विद्यार्थी ते शिक्षक’ असा प्रवास उलगडला. गुंजाळ यांनी शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकता या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा सर्वांनी सक्रिय प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’ प्रास्ताविक सचिन नाईक यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस शेखर केंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..