पाषाण-सूस रस्त्यावरील कोंडी सुटणार उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहनचालकांसह स्थानिकांची डोकेदुखी थांबणार
औंध, ता. ३१ ः पाषाण-सूस रस्त्यावरील अंतिम टप्प्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या मार्गावरील गेल्या कित्येक वर्षांपासून ज्वलंत असलेला वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.
वाहनांची वाढती संख्या, त्यात अरुंद रस्त्यामुळे पाषाण-सूस रस्त्यावरील पाषाण, बालाजी चौक ते महामार्गावरील उड्डाणपुलादरम्यान हमखास होणारी वाहतूक कोंडी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत होती. परिणामी, वायू व ध्वनी प्रदूषणासह वाहनचालकांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत होते. सूस व परिसरात असलेल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, कर्मचारी, तसेच हिंजवडीतील आयटी कंपन्यांचे कर्मचारी यांच्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वाहतुकीच्या तुलनेत उड्डाणपूल अरुंद असल्याने सकाळ-सायंकाळ मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. परंतु, पाषाण-सूसदरम्यान महामार्गावर होत असलेल्या नवीन उड्डाणपुलामुळे या मार्गावरील कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे. यासाठी पालिकेचा ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने हे काम तीन वर्षांत होणे अपेक्षित होते. मात्र, जून २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे महापालिकेचे अभियंता अजय वायसे यांनी सांगितले.
रुंदीकरण जलदगतीने व्हावे...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे या कामास अवधी लागला. पण, आता यापुढे वाहतूक कोंडीतून येथील स्थानिक नागरिकांसह मुळशी तालुक्यात जाणाऱ्या प्रवाशांची सुटका होईल. विशेष म्हणजे या मार्गावर हिंजवडीत असलेल्या आयटी कंपन्या, सूस रस्ता व पुढील भागातील शैक्षणिक संस्था येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहनांची वाढती संख्या या रस्त्यावर मर्यादेबाहेर जात आहे, याचा फटका स्थानिक रहिवाशांसह सर्वांनाच बसत आहे. त्यामुळे या रस्त्याचे जलदगतीने रुंदीकरण करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्दे :
- उड्डाणपुलासाठी एकूण खर्च ः ४५कोटी
- कामाची सुरुवात ः एप्रिल २०२०
- कामाची मुदत ः तीन वर्षे (२०२३)
- आरसीसी स्लॅबची लांबी ः १२२ मीटर
- ॲप्रोच रोडसह लांबी ः ४५८ मीटर
- पुलाची रुंदी ः १७.२ मीटर
- महामार्ग प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र
- महापालिकेच्या निधीतून काम पूर्ण केले जाणार
- वेळ, इंधन व प्रदूषणाची होणार बचत
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पाषाण मार्गे मुळशी व कोकणात जाण्यासाठी सोयीचा मार्ग
‘‘गेल्या काही वर्षापासून येथील वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. त्यादृष्टीने रस्ते व उड्डाणपूल होणे आवश्यक होते. पण, या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. याशिवाय, कॉसमॉस बॅंक जवळील रस्ता होणेही तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा पाषाण गावठाणात कोंडीची समस्या निर्माण होईल. त्यामुळे महामार्गावरील उड्डाणपुलाप्रमाणेच या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे.’’
- जयप्रकाश निम्हण, स्थानिक रहिवासी
‘‘या उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने सुरू असून, जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’
- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.