महापालिकेला वीज बचतीसाठी ‘महाप्रित’ची साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेला वीज बचतीसाठी ‘महाप्रित’ची साथ
महापालिकेला वीज बचतीसाठी ‘महाप्रित’ची साथ

महापालिकेला वीज बचतीसाठी ‘महाप्रित’ची साथ

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः पुणे महापालिकेला दरवर्षी वीज बिलापोटी किमान दीडशे कोटी रुपये खर्च करावे लागतात. यात बचत करण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित कंपनीकडून (महाप्रित) वीज बचतीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. महाप्रितने किमान १५ टक्के वीज बचत केली तर त्यांना त्याचा मोबदला म्हणून बचतीच्या ८० टक्के रक्कम दिली जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे जलशुद्धीकरण केंद्र, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प, स्मशानभूमी, उद्याने, मंडई, पथ दिवे, नाट्यगृहे, समाजमंदिर, प्राणीसंग्रहालय, क्षेत्रीय कार्यालये, क्रीडांगण यासह इतर ठिकाणी वर्षभरात २९ कोटी १० लाख युनिट वीज वापर होतो. विजेची बचत करून खर्च कमी करण्यासाठी निविदा मागवली होती. निविदा भरणाऱ्या कंपनीकडून वीज बचत सुचविणे, त्यासाठी करावे लागणारे बदल व फायदे याचा तपशील व डीपीआर देणे अपेक्षित होते. तसेच कंपनीची वार्षिक उलाढाल ६५ कोटीच्या पुढे असणे आवश्‍यक होते. पण ही निविदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता असल्याने ती रद्द करण्यात आली. त्यानंतर महाप्रितचा पर्याय समोर आला होता. महाप्रित हा राज्य शासनाचा उपक्रम आहे. ही कंपनी सोलार पार्क, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आणि एनर्जी सेव्हिंग क्षेत्रात कंपनी काम करते. महाप्रितचा प्रस्ताव महापालिकेने स्वीकारल्यानंतर पाणी पुरवठा विभागातील सर्व पंपिंग स्टेशन, रुग्णालय, स्मशानभूमी, पुणे मनपा मुख्य भवन, सांस्कृतिक भवन, नाट्यगृहे आदी ठिकाणी एनर्जी ऑडिट करण्यासाठी महाप्रितची नियुक्ती करण्यात आलेली आहे.याबाबत स्थायी समिती समोर प्रस्ताव आला होता. त्यास मान्यता देण्यात आली. वीज बचत करण्यासाठी महाप्रितला विद्युत उपकरणे, मोटारी यासह इतर साहित्य विनामोबदला बदलावे लागेल. नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये याचा उपयोग जास्त होणार आहे.

महाप्रित काय करणार ?
- महापालिकेच्या वीज वापरात कमीत कमी १५ टक्के वीज बचतीची हमी.
- १५ टक्के वीज बिलातून आठ वर्षासाठी ८० टक्के रक्कम महाप्रितला व २० टक्के महापालिकेला
- करार झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत वीज बचतीचा डीपीआर देणे आवश्‍यक
- महाप्रितकडून बदलण्यात येणाऱ्या उपकरणांची देखभाल व दुरुस्ती महाप्रित विनामोबदला करणार
- प्राथमिक अभ्यासानुसार सुमारे ८० कोटीची गुंतवणूक महाप्रित करणार
-८ वर्षानंतर बदललेली सर्व यंत्रणा, साहित्य, उपकरणे महापालकिला हस्तांतरित करावी लागणार
---
प्रमुख विभागांचा होणारा वीज वापर आणि त्याचे बिल
विभाग - वार्षिक वीज वापर(युनिट) -रक्कम
मैलापाणी शुद्धीकरण केंद्र - ९.२ कोटी -२०.८३ कोटी
जल शुद्धीकरण केंद्र - १८.८४ कोटी - १२३.१२ कोटी
रुग्णालये - ४०.१२ लाख - १.९६ कोटी
नाट्यगृहे -४.१५ लाख -३०.२५ लाख
स्मशानभूमी - १५.५९ लाख -७६.७६ लाख
शाळा - ६.८५ लाख -३.३३ कोटी
क्षेत्रीय कार्यालये -१७.९६ लाख - १.३० कोटी
कचरा प्रकल्प -१२.५२ लाख - ९१.१८ लाख
क्रीडांगणे - ६७ हजार - ४.९१ लाख
हॉटमिक्स प्लांट -२.९२ लाख - २१.२७ लाख
बायोगॅस प्लांट -९.६२ लाख - ७०.०४ लाख
इतर - ३.३५ लाख - २४.२८ लाख
एकूण -२९.१० कोटी - १५३.७४कोटी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top