वाहतूक पोलिसांची ‘दंडशाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिसांची ‘दंडशाही’
वाहतूक पोलिसांची ‘दंडशाही’

वाहतूक पोलिसांची ‘दंडशाही’

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः तुम्ही हेल्मेट व मास्क घातले आहे, तुम्ही सिग्नलला थांबून वाहतूक नियमांचे पालनही करीत आहात; एवढेच नाही तर तुम्ही वाहन व्यवस्थित चालवीत आहात, असे सगळे असले, तरीही चौकाचौकात थांबलेले किंवा आडबाजूला घोळक्‍याने थांबलेले वाहतूक पोलिस भररस्त्यात तुमचे वाहन शंभर टक्के अडविणारचं, भलेही तुम्ही नियमांचा भंग केला नसेल, तरीही तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी करून दंड भरण्याची, गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून दंड वसुली करणार किंवा ‘चिरीमिरी’चा मध्यम मार्ग पत्करणार, असे वास्तवदर्शी चित्र सध्या शहरात सुरू असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या कामगिरीवरून दिसते.

कारवाई न करण्यासाठी टेम्पोचालकाकडे पाच हजारांची लाच मागणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसावर पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. संबंधित वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकालाह नियंत्रण कक्षात जमा केले. इतकी मोठी कारवाई झाल्यानंतर तरी किमान वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या गैरप्रकाराला जरब बसेल, अशी स्थिती होती. प्रत्यक्षात या कारवाईचा कुठलाही परिणाम वाहतूक शाखेच्या पोलिसांवर दिसत नसल्याची सद्यःस्थिती आहे. कोरोनातून बाहेर पडताना आता कुठे हाताला रोजगार मिळत असतानाच, पोलिसांच्या अशा कारवाईमुळे त्यावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत.

- नियम मोडले नाही, तरी कारवाई?
काही अपवाद वगळता बहुतांश चालक नियमांचे प्रामाणिकपणे पालन करतात. सिग्नलला ‘झेब्रा क्रॉसिंग’च्या मागे वाहने थांबवितात, हेल्मेट, मास्क परिधान करतात. कारमध्ये सीटबेल्टचा वापर करतात, असे असूनही चौकाचौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या पोलिसांकडून संबंधित वाहनचालकांना बाजूला घेतले जाते. त्यांच्याकडे वाहन परवाना, विमा, पीयूसी अशा कागदपत्रांची मागणी केली जाते. अनेकदा नागरिकांकडे अशा कागदपत्रांचा अभाव असतो. तसेच, संबंधित वाहनांवर दंड असल्याचे दाखवून त्यांना कुठल्याही परिस्थितीत दंड भरण्यास भाग पाडले जाते. दंड न भरल्यास वाहन जप्त करण्याची, दंडात्मक कारवाईची किंवा प्रकरण न्यायालयात नेण्याची भाषा वापरली जाते. अशा कारवाईमुळे नागरिक हवालदिल झाल्याची सद्यःस्थिती आहे.

- धावत्या वाहनांना अडविणे जीवघेणे
सिग्नल सुटल्यानंतर रस्त्याच्यामध्ये जाऊन धावत्या वाहनांना अडविण्याचा प्रकारही वाहतूक पोलिसांकडून केला जातो. यामुळे पोलिसाबरोबरच वाहनचालकाचाही अपघात होऊन जीवघेणी घटना घडू शकते, असे माहीत असूनही पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यावर अधिक भर दिला जात आहे.

- ‘कोपरा कारवाई करणाऱ्यांना आवरा’
चौकात थांबून वाहतूक सुरळीत करण्याचे काम प्राधान्याने करायला पाहिजे. पण, प्रत्यक्षात वाहतूक पोलिस घोळक्‍याने चौकापासून काही अंतरावर एखाद्या कोपऱ्यात थांबून छुप्या पद्धतीने चालक येण्याची वाट पाहतात. त्याने नियमांचे उल्लंघन केलेले असो किंवा नसो, त्यांची वाहने अडवून, त्यांना बाजूला घेत दंडवसुलीचा किंवा कारवाईचा ‘पाढा’ वाचला जातो. भितीपोटी, हातावर पोट असल्याने किंवा दंडाच्या रकमेइतके पैसे देण्याइतपतही खिशात पैसे नसल्याने अखेर चालक त्यांच्या हातापाया पडून थोडी ‘चिरीमिरी’ सरकवून तेथून काढता पाया घेतो. जिजामाता चौक, मजूर अड्डा चौक (बुधवार चौक), समाधान चौक, सणस मैदान, ब्रेमेन चौक, चांदणी चौक, नळस्टॉप, खडकीतील संविधान चौक, बोपोडी चौक, मार्केट यार्ड येथील उत्सव चौक, विधी महाविद्यालय रस्ता, राधा चौक, बाणेर फाटा चौक, पु. ल. देशपांडे गार्डन, सिंहगड रस्ता, दत्तवाडी कॉर्नर चौक, निलायम चित्रपटगृह परिसर, येरवडा साप्रस, शांतिनगर अशा अनेक चौकांच्या कोपऱ्यात थांबून पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना आवरा, अशी मागणी अनेक वाहनचालकांकडून केली जात आहे.

‘‘वाहतुकीचे नियम मोडले नाही, तरी पोलिस कारवाई करतात. सिग्नल सुटल्यानंतर अचानक धावत येऊन वाहनचालकांना पकडण्याचा प्रयत्न करतात. इतर वाहनचालकही घाबरून अचानक
ब्रेक दाबतात. परिणामी, अपघात होतात. पोलिसांनी कारवाई जरूर करावी, त्यासाठी कोणाचा जीव घेऊ नये.’’
- अनुप जोशी, वाहनचालक

‘‘नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नियमनावर भर द्यावा, असे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी चौकात थांबण्याऐवजी कोपऱ्यात थांबून वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली जाईल.’’
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

सद्यःस्थिती काय?
शहरातील वाहतूक पोलिसांची संख्या ः ९८०
शहरातील एकूण चौक ः ३६१
शहरातील सिग्नल यंत्रणा ः २६१
सुरू असलेले सिग्नल ः २३१

- वाहतूक पोलिसांबद्दल तुमचे मत इथे नोंदवा ः ८४८४९७३६०२.

PNE22S46540

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top