पटोले, कडूंचे ६० दिवस फोन टॅप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Phone Tapping
पटोले, कडूंचे ६० दिवस फोन टॅप

पटोले, कडूंचे ६० दिवस फोन टॅप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदविला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल ६० दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

शुक्‍ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. याप्रकरणी महाराष्ट्र विधीमंडळाच्या २०२१च्या अधिवेशनामध्ये २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीमधील संपूर्ण फोन टॅपींगप्रकरणी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यानुसार तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्च समितीच्या अहवाल शासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार, २६ फेब्रुवारी रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात शुक्‍ला यांच्यासह इतर संबंधित व्यक्तींवर भारतीय तार अधिनियम कायदा कलम २६ प्रमाणे बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक वैशाली भोसले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई काय केली जाणार आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, ‘‘संबंधित प्रकरणाचा तपास संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदविला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’’ दरम्यान, या प्रकरणामध्ये तत्कालीन अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे.

नेत्यांचे ६० दिवस फोन टॅप
पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख या तिघांना विशिष्ट नावांचा वापर करून १८ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर २०१७ या ६० दिवसांच्या कालावधीत फोन टॅप केला. त्यासाठी विशिष्ट नावांचा कोडनेम वापरला होता. संबंधित व्यक्तींचा पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अमली पदार्थ पुरविण्यात हात असल्याचे नमूद केले होते. संजय काकडे यांचे कुख्यात बापू नायर टोळीशी संबंध असल्याचे सांगून त्यादृष्टीने त्यांचेही फोन ६० दिवस टॅप केले होते. काकडे यांच्यासाठी नायर टोळीतील अभिजित नायर या गुंडाच्या नावाचा कोडनेम वापरला होता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..