
गुंतवणुकीच्या बहाण्याने ८४ लाखांची फसवणुक
पुणे, ता. १ ः आभासी चलनामध्ये गुंतवणुक केल्यास जादा नफा मिळेल, असे सांगून पुण्यासह देशातील गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यास पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतून अटक केली. आरोपीने पुण्यातील गुंतवणूकदारांची तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे.
गणेश शिवकुमार सागर (वय ४७, रा. द्वारका, नवी दिल्ली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरीकांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावरुन सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. दुबईतील बिटसोलाइव्हज प्रा. लि. या कंपनीसह इंग्लंडमधील बुलइन्फोटेक या दोन्ही कंपन्यांकडून समाजमाध्यमांद्वारे भारतातील व परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. नागरीकांनी गुंतवणूक केल्यास त्यांना जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात येत होते. त्यानुसार, अनेक नागरीकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणुक केली. त्यानंतर अनेक दिवस उलटूनही त्यांना परतावा मिळत नव्हता, तसेच संबंधित संकेतस्थळेही बंद झाली होती. त्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते.
दरम्यान, दुबईस्थित बिटसोलाइव्हज कंपनीचा संचालक गणेश सागर हा काही दिवसांपूर्वीच दिल्लीला परतल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सायबर पोलिसांच्या पथकाने त्याचा दिल्लीत जाऊन शोध घेतला. त्यानंतर त्यास अटक केली. त्यास शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, संगीता माळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.