
कोरोना मृत्यूदराची नीचांकी नोंद राज्यात गेल्या नऊ महिन्यांमधील चित्र; अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाणही कमी
पुणे, ता. १ : कोरोना संसर्गाच्या गेल्या नऊ महिन्यांमधील नीचांकी मृत्यूदराची नोंद राज्यात होत आहे. तिसऱ्या लाटेत अत्यवस्थ होऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने मृत्यूदर सातत्याने कमी राहिला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
राज्यात कोरोनामुळे मंगळवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये एक लाख ४३ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे १२ एप्रिल २०२० रोजी कोरोना उद्रेकातील सर्वाधिक मृत्यूदर नोंदला गेला. त्या दिवशी राज्यातील मृत्यूदर ७.५ टक्के होता. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यानंतर मृत्यूदराचा टक्काही कमी झाला, असे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
राज्यात गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. ही दुसऱ्या लाटेची सुरवात ठरली. त्या वेळी १८ जूनला कोरोनामुळे एका दिवसांमध्ये ४.८ टक्के मृत्यूदर होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील हा मृत्यूदर २.५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यासाठी सप्टेंबर उजाडला. गेल्या वर्षी १५ मे रोजी सर्वांत कमी म्हणजे १.५ टक्के होता. हा आतापर्यंतच्या कोरोना उद्रेकातील नीचांकी मृत्यूदर ठरला.
यावर्षी जानेवारीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यात वेगाने वाढू लागली. ही कोरोनाची तिसरी लाट असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या बदललेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे ही लाट निर्माण झाली होती. या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असली तरीही त्यातून अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा थेट परिणाम मृत्यूदर कमी होण्यावर झाला आहे, असे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय तज्ज्ञ संताजी चव्हाण म्हणाले, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत विषाणूची संसर्गाची क्षमता वाढली होती. पण, त्यातून अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. रुग्णांना विषाणूंचा संसर्ग श्वसनमार्गाच्या वरच्या भागात होत असल्याने फुफ्फुसे सुरक्षित राहात होती. त्यामुळे उपचारांसाठी ऑक्सिजन ठेवाव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होता. मधुमेह, श्वसनाचे विकार, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास काळजी वाढत होती. मात्र, त्यातही लवकर निदान आणि प्रभावी उपचार यातून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.”
राज्यातील तिसरी लाटेत कोरोनाचा मृत्यूदर ०.१५ टक्क्यांपर्यंत कमी आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के आहे. हा मृत्यूदर कोरोनाच्या तीनही लाटांची सरासरी आहे. या लाटेत रुग्णसंख्या वाढली मात्र, मृतांचे प्रमाण कमी राहीले. त्यातून हा मृत्यूदर कमी झाला.
-डॉ. प्रदीप आवटे, साथ रोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग