झुंड परीक्षण

झुंड परीक्षण

Published on

सूचना - फोटो नंबर - ८००२
............................
नवा चित्रपट
झुंड

थरारक, प्रेरक...भेदक!
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट खरं तर ‘झोपडपट्टीतली मुलं खेळत असलेला फुटबॉल’ या विषयापासून सुरू होतो खरा; पण तो तिथंच राहत नाही. तो त्याच्या किती तरी पलीकडे जातो. व्यसनांमागची, गुन्हेगारी प्रवृत्तीमागची कारणं, वर्गीय भेद, सरकारी नियमांचं जंजाळ अशा अनेक गोष्टींवर तो भेदकपणे भाष्य करतोच; पण केवळ भाष्य न करता माणुसकी, चांगुलपणा अनेक गोष्टींवर मात करू शकतात हेही तो अतिशय सकारात्मकपणे सांगतो आणि तिथंच जिंकतो. सामाजिक वास्तवाचा दाह ‘झुंड’मधून दिसतो हे जितकं खरं आहे, तितकंच कटुतेच्या पलीकडे गेल्यावर किती मोठ्या गोष्टी होऊ शकतात हेही तो सांगतो. कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारे, अतिशय सामान्य दिसणाऱ्या नॉन-ॲक्टर्सकडून जबरदस्त काम करून घेत त्यांच्याबद्दल प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आपुलकी निर्माण करण्याचं फार मोठं काम मंजुळे यांनी केलं आहे.
विजय बोराडे (अमिताभ बच्चन) या क्रीडाशिक्षकाला त्याच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीतल्या मुलांमध्ये विलक्षण कौशल्य दिसतं आणि त्याच वेळी त्याच्या महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांची सुखासीन वृत्तीही लक्षात येते. त्यातून ते या दोन्ही संघांमध्ये एक सद्‍भावना सामना ठेवायचं ठरवतात. हा सामना झाल्यावर पुढे काय काय होत जातं, ते विलक्षण पद्धतीनं हा चित्रपट सांगतो. अंकुश (अंकुश गेडाम), रजिया (रजिया काझी), बोराडे यांचा मुलगा (अर्जुन राधाकृष्णन), मोनिका (रिंकू राजगुरू) या सगळ्यांच्या कहाण्या जोडत, प्रत्येकाच्या हृदयाला भिडत ‘झुंड’ संपतो, तेव्हा तो एक विलक्षण कालवाकालव प्रत्येकाच्या मनात होत राहील आणि त्याच वेळी इतरांकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलत जाईल, याची पुरेपूर काळजी घेतो.
क्रीडा, खेळाडू या विषयावर गेल्या काही वर्षांत किती तरी चित्रपट आले असले, तरी मंजुळे यांनी त्याला वेगळा आयाम दिला आहे. किंबहुना चित्रपटाचा मुख्य भाग असलेला फुटबॉल सामना संपल्यावरच चित्रपट खऱ्या अर्थानं सुरू होतो. ‘झोपडपट्टी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा’ या विषयावर चित्रपट येतो, तेव्हा मंजुळे हळूच मैदानावरून त्यांचा कॅमेरा आणखी उंचीवर नेतात आणि उंचावरून वास्तवाचं दर्शन घडवतात. शेवटच्या पाऊण तासात तर ते खूप वेगळं काही तरी सांगत राहतात. ‘झुंड’मध्ये रुढ अर्थानं नाट्यमय वळणं नाहीत, ओढूनताणून आणलेले संवाद नाहीत. किंबहुना अनेकदा सहज बोलल्यासारखेच संवाद आहेत आणि हा सहजपणा हेच चित्रपटाचं बलस्थान आहे. बोराडे यांना पावसात झोपडपट्टीतल्या मुलांचं दिसणारं कौशल्य, प्रत्यक्ष फुटबॉल सामना, कागदपत्रं मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मुलांना करावा लागणारा आटापिटा, सामना सुरू असताना एका काकांची कॉमेंट्री असे किती तरी भाग उत्तम आहेत. बोराडे यांचा मुलगा कॉंप्युटरवर कोलंबिया ॲडमिशन असं टाइप करत असताना लगेच कट टू प्रौढ साक्षरता वर्गाची पाटी किंवा मोनिकाला स्वतःची ओळख कशी सिद्ध करायची याचा पेच पडलेला असताना मागं दिसणारी डिजिटल सेंटरची पाटी अशा खास ‘मंजुळे टच’ गोष्टी जागोजागी आहेत.
अमिताभ बच्चन हे भूमिका अक्षरशः जगतात. झोपडपट्टीतल्या या मुलांकडे त्यांनी प्रेमपूर्वक बघणं, त्यांच्यावर रागवणं, त्यांच्यासाठी भांडणं हे अतिशय आतून आल्याचं जाणवतं. बच्चन या चित्रपटात आल्यानं चित्रपटाचं मिश्रण आणखी एकजीव होण्यात मदत झाली आहे. मैदान खराब झाल्यानंतर विदीर्ण झालेले बोराडे परत येतात आणि मुलं ते मैदान साफ करत असतात तेव्हा त्यांनी दाखवलेले भाव कमाल. न्यायालयातला त्यांचा संवाद अर्थातच हुकमी. खरा कमाल करतो तो अंकुश गेडाम. त्याचा चित्रपटभरचा प्रवास थक्क करणारा आहे. विमानतळावरचा प्रसंग तर कमाल. इतरही छोटेछोटे कलाकार विलक्षण कामगिरी करतात ते पडद्यावरच बघायला हवं. अजय-अतुल यांचं संगीत, साकेत कानेटकरचं पार्श्वसंगीत खास.
चित्रपटात त्रुटी नाहीत असं नाही. अमिताभचा मुलगा भारतात परत येण्याचं कारण कळत नाही, फुटबॉल सामन्याचा भाग जास्त लांबला आहे आणि चित्रपटाची एकूण लांबीही कमी केली असती तर परिणामकारकता वाढली असती. मात्र, या त्रुटी किरकोळ आहेत. ‘झुंड’ हा चित्रपट सगळ्यांनी बघायला पाहिजे आणि स्वतःलासुद्धा तपासून घेतलं पाहिजे. बोराडे सर त्यांच्या सोसायटीचं दार उघडून झोपडपट्टी भागात प्रवेश करतात तो प्रसंग ही खास ‘मंजुळे स्टाईल’ आहे. प्रेक्षकांनीही आधी चित्रपटगृहाचं आणि मनाचंही दार नक्की उघडून या प्रयोगाला नक्की दाद दिली पाहिजे.
रेटिंग ः चार
..........
- मंदार कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com