
फक्त कर वसूल करा; सुविधांचे काय?
पुणे : पुणे महापालिकेकडून अव्वाच्या सव्वा मिळकतकर घेत असल्याने सर्वसामान्य पुणेकरांचे कंबरडे मोडले आहे. आमच्याकडून पैसे घेता, तर त्या प्रमाणात सुविधा तरी द्या. कचरा उचलण्यासाठी, पाण्यासाठीही वेगळे पैसे मोजावे लागत आहेत. एकाच सोसायटीमध्ये एकाला कमी दुसऱ्याला जास्त कर लावला जात आहे. यासह अनेक समस्या पुणेकरांनी ‘सकाळ’कडे मांडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. ‘सकाळ’मध्ये मिळकतकराच्या आकारणीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यावर पुणेकरांनी त्यांची मते व्यक्त केली. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे.
पुणे महानगरपालिकेला भरमसाट मिळकत कर मिळूनही, रस्त्याची कामे, रस्ते, नालेसफाई याचे नियोजन होत नाही. पुण्यात ठीक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते ते काढण्यासाठी काही होत नाही. असे अनेक प्रश्न सध्या करदात्यांना भेडसावत असतात. गेल्या वर्षी धानोरीत महापूर आला घरात, पण त्यावरही अद्याप काहीच उपाययोजना नाही.
- ज्ञानदेव जाधव
पुणे महापालिकेचा मिळकतकर खूप आहे, पण आम्ही महापालिकेला पूर्ण कर भरत आहोत. असे असले तरी धायरीमध्ये पाणी, चांगले रस्ते, कचरा व्यवस्थापन या सुविधाही धड मिळत नाहीत. टँकरने पाणी विकत घ्यावे लागते, घंटा गाडीसाठीही पैसे द्यावे लागत आहेत. यासह इतर अनेक समस्या आहेत.
- अभय तिखे, धायरी
पुणे महापालिकेने यावर्षी चाळीस टक्के रकमेच्या फरकासह मिळकराची देयके पाठविली आहेत. नेहमीच्या बिलांपेक्षा ही देयके तिप्पट आहेत. जीवनावश्यक वस्तूची महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी, कमी झालेले पगार यामुळे मेटाकुटीस आलेल्या सामान्य जनतेला हा दुष्काळात तेरावा महिना आहे. ही वाढीव बिले भरणे अशक्य आहे. ही वाढ रद्द करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा.
- शिवाजी पाठारे, कोथरूड
मार्च २०१७ मध्ये उंड्रीमध्ये इरा सोसायटीत घेतला, याच वर्षी महापालिकेत गाव समाविष्ट झाले. माझ्या ६०० चौरस फुटाच्या फ्लॅटसाठी १५ हजार कर आकारणी होत आहे, त्यात गेल्या पाच वर्षाचे ७६ हजार रुपये बिल आले आल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. महापालिकेकडून पाणी, कचरा अशा सुविधा मिळत नाहीत, त्यासाठी दर महिन्याला ३५०० रुपये खर्च करावा लागत आहे. माझ्याच सोसायटीतील ए आणि बी बिल्डिंग मधल्या ९०० चौरस फुटाच्या फ्लॅटला ५ हजार रुपये कर येतो, पण आमची सी बिल्डिंगची नोंद महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरची असल्याने आम्हाला जास्त कर दिला जातो. हा अन्याय आहे. याविषयी तक्रार केली पण सगळीकडे उडवाउडवीची उत्तरे दिली.
- दिगंबर जमनिक
माझ्या सासूबाईंच्या कात्रज येथील ४१० स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटला दरवर्षी रुपये सुमारे २८०० रुपये कर आकारणी होत होती. परंतु यावर्षी रुपये १५ हजार कर आला आहे. हे कर वाढीचे गणित आकलनशक्तीच्या पलीकडे आहे.
- के. टी. देशमुख
पुण्यातील निवासी मिळकतकरात ४५ टक्के सवलत रद्द झाल्यानंतर दर वर्षी वाढीव बिल आले. सगळीकडे रस्ते खणून ठेवले आहेत. कचरा, पालापाचोळा पोती ठिकठिकाणी भरून ठेवली आहेत. मात्र पदपथ व सफाईकर व्यवस्थित आकारले जाते. कर भरणाऱ्यांना दिलासा नाही, पण बुडविणाऱ्यांसाठी अभय योजना राबविली जाते, हा कुठला न्याय? जुनी इमारत नवीन झाली पण क्षेत्रफळ तीच असताना बिलात वाढ झाली.
- नीलम सांगलीकर
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..