
सशस्त्र दलातील १४३ अधिकाऱ्यांना पदवी
पुणे, ता. २४ ः लष्कराच्या तिन्ही दलातील अधिकाऱ्यांना तांत्रिक शिक्षण पुरविणाऱ्या पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (मिलिट) ‘डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स’ (डिएसटीसी) पदवी समारंभ नुकताच झाला. यामध्ये सशस्त्र दलातील १४३ अधिकाऱ्यांनी पदवी पूर्ण केली. यात श्रीलंकेतील सात अधिकाऱ्यांचा समावेश होता.
लष्कराच्या विविध विभाग आणि मुख्यालयांमधील नियुक्त्यांसाठी सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांसाठी डिएसटीसीचा अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतो. या पदवी समारंभ कार्यक्रमात चीफ ऑफ इंटिग्रेटेड स्टाफ टू चेअरमन, चीफ्स ऑफ स्टाफ एअर मार्शल बी. आर. कृष्णा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मिलिटचे प्रमुख एअर व्हाइस मार्शल व्ही. राजशेखर, तिन्ही दलातील वरिष्ठ प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.
एअर मार्शल कृष्णा म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज सारख्या तंत्रज्ञानाचे मिलिटद्वारे देण्यात येणारे प्रशिक्षण कौतुकास्पद आहे. अधिकाऱ्यांनी या संस्थेत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या सुरक्षेसाठी करावा. सशस्त्र दलांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर तसेच त्यांचा वापर वाढविण्याची गरज आहे. नव्याने उदयास येत असलेल्या तंत्रज्ञानाची जाण असलेल्या अधिकाऱ्यांची सशस्त्र दलांना आवश्यकता आहे. त्यामुळे सशस्त्र दलात आवश्यक ती अद्ययावत उपकरणे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी अशा विशिष्ट तंत्रज्ञानाचा सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे.’’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पने अंतर्गत अधिकाधिक प्रकल्प यशस्वी व्हावेत, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना तांत्रिक गरजा तयार करताना वास्तववादी राहण्याचा सल्ला दिला.
या कोर्स दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..