आदित्यला मिळाला ‘नवोदित कलाकार’ पुरस्कार
पुणे, ता. २४ ः कलेला वयाची जाण नसते, ही गोष्ट सिद्ध केली आहे ती पुण्यातील अवघ्या १३ वर्षांच्या आदित्य योगी याने. काश्मीरच्या निसर्गरम्य सौंदर्याला आपल्या रंगांच्या कलेतून जपणाऱ्या आदित्यला ‘नवोदित कलाकार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने नुकतेच काश्मीर येथे पार पडलेल्या ‘स्वर्ग’ या कार्यशाळेत भाग घेत अनेकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले आहे.
‘कलारंभ’ या संस्थेने ‘स्वर्ग’ कार्यशाळेचे तसेच ‘लाइव्ह पेंटिंग’चे आयोजन केले होते. यामध्ये देशातील ९० चित्रकारांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात आदित्य हा सर्वांत लहान चित्रकार होता. या सर्व कलाकारांनी काश्मीरच्या विविध ठिकाणी लाइव्ह पेंटिंग अंतर्गत निसर्गचित्रे प्रत्यक्ष रेखाटली. यात आदित्यनेही सहभाग घेत शिकाऱ्याचे सुंदर चित्र साकारले. त्यासाठी त्याला चित्रकार बिजय बिस्वाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षभरापासून आदित्य कलारंभ या संस्थेशी जुळला असून त्याने आत्तापर्यंत विविध प्रकारची चित्रे साकारली आहेत. नवोदित कलाकारांना आपल्या चित्रकलेचे प्रदर्शन करणे तसेच प्रसिद्ध चित्रकारांचे मार्गदर्शन मिळावे, या अनुषंगाने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
आदित्य म्हणाला, ‘‘या कार्यशाळेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. रंग निवडण्यापासून ते निसर्ग चित्र काढताना कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करणे अशा सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळाले. काश्मीर हे पृथ्वीवरील खरे नंदनवन आहे आणि कॅनव्हासद्वारे काश्मीर दाखवू इच्छिणाऱ्या तरुण चित्रकारांसाठी बरेच काही आहे. या पुरस्कारामुळे उत्साह वाढला आहे. भविष्यात चित्रकलेत करिअर करायचे असून त्यासाठी प्रशिक्षण घेणार आहे.’’
आदित्यला चित्रकलेची आवड आहे, पण या क्षेत्रात कुटुंबातील कोणतेही सदस्य नसल्याने फक्त आवड किंवा छंद म्हणून नाही तर करियरच्या दृष्टीने चित्रकलेच्या क्षेत्रात भविष्य आहे का, याची जरा शंका होती. मात्र, या कार्यशाळेमुळे अनेकांचे मार्गदर्शन मिळाले असून आम्ही सुद्धा त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पाठिंबा देत आहोत. तसेच त्याने आत्तापर्यंत साकारलेल्या विविध प्रकारच्या चित्रांचे लवकरच प्रदर्शन भरविण्याची इच्छा आहे.
- स्वप्ना योगी, आदित्यची आई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.