मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे | Mental Health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mental Health
मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे

मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे

पुणे - कोरोनाचा (Corona) परिणाम केवळ शारीरिकच नाही तर आता नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही (Mental Health) होत असल्याचे गेल्या दोन वर्षात प्रकर्षाने जाणवले. त्यात कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्ण (Patient) संख्या यामुळे मागील दोन लाटांप्रमाणे पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास याचा परिणाम नोकरी, व्यवसाय, शिक्षणव्यवस्था आदींवर होईल का, असा प्रश्‍न लोकांच्या मनात उमटत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी खचून न जाता येणाऱ्या संकटांचा सामना कुटुंबाच्या मदतीने करावा. याबरोबरच आपले शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जपण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. अशात मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम तसेच, मानसिक आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, मनोविकृतीशास्त्रतज्ज्ञ यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यात मानसिक आरोग्याबाबत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

याबाबत वरिष्ठ मनोविकृतीशास्त्रज्ञ डॉ. कृष्णा कदम म्हणाले, ‘‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यात ओमिक्रॉनचाही संसर्ग अनेकांना होत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर नोकरी, व्यवसाय आणि शाळा बंद होण्याची शक्यता अशा इतर गोष्टींवर होणाऱ्या परिणामाची चिंता लोकांमध्ये दिसून येत आहे. सध्या अशा प्रकारची समस्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवल्यास घरातच राहून सर्व निर्बंधांचे पालन करण्याचे संयम नागरिकांमध्ये कमी होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यात समाज माध्यमातून पसरणाऱ्या खोट्या अफवा, चुकीची माहिती वेगाने पसरते, परिणामी लोकांचे मानसिक स्वास्थ बाधित होते. अशात समाज माध्यमाचा वापर त्यातील माहिती योग्य आहे की, नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाने कोरोनाची वैज्ञानिकदृष्ट्या माहिती समजून घेणे आवश्‍यक आहे. तसेच घरातील मुलांना देखील ते समजावून सांगणे आवश्यक आहे.’’

हेही वाचा: ट्रॅक्टरने दिली पाठीमागून धडक; अपघातामध्ये पती-पत्नीचा मृत्यू

कोरोना विषाणूची शरीराला लागण झाली इथपर्यंत ही गोष्ट सीमित नसते, तर त्याला एक मानसिक बाजूदेखील असते. त्यामुळे चिडचिड, सतत मूड बदलणे, उत्साह नसणे, जगण्यात अर्थ नसल्यासारखे वाटणे या गोष्टी लोकांकडून नोंदविण्यात येत आहेत. मानसिक आरोग्यविषयक त्रास लहान मुलांनाही होतो. त्यांनादेखील घरकामात, खेळात किंवा अभ्यासात रमवा. त्यांच्याशी बोला, त्यांना आश्वासक आधार द्या आणि त्यांची काळजी घ्या.

- स्मिता कुलकर्णी, ज्येष्ठ समुपदेशक

मानसिक आरोग्यावरील परिणाम...

 • एकाग्रता कमी होणे

 • झोप व भूक मंदावणे

 • काळजी, नैराश्‍य येणे

 • चिडचिड, राग किंवा हतबल वाटणे

उपाययोजना...

 • भावनांचे व्यवस्थापन/नियंत्रण मिळविण्याकरिता योग्य आहार

 • पुरेशी झोप व नियमित व्यायाम

 • कुटुंबीयांसह सकस संवाद

 • स्वतःच्या आरोग्याविषयी सतर्कता

 • सोशल डिस्टन्सिंग, सोशल अवेअरनेस गरजेचा

तणावाची लक्षणे...

 • झोपेतून दचकून उठणे

 • दरदरून घाम येणे

 • सतत डोके दुखणे

 • सतत भीती वाटणे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mental health
loading image
go to top