सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘नॅशनल मॅरिटाइम’बरोबर करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 
‘नॅशनल मॅरिटाइम’बरोबर करार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘नॅशनल मॅरिटाइम’बरोबर करार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘नॅशनल मॅरिटाइम’बरोबर करार

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या नॅशनल मॅरिटाइम फाउंडेशनबरोबर नुकताच सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क’ हा नवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू झाला असून, या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली आहे.

या प्रसंगी नॅशनल मॅरिटाइम फाउंडेशनचे महासंचालक प्रदीप चौहान यांचे ‘युद्धनौकांचा ऐतिहासिक आणि समकालीन विकास: प्रकार, प्रकल्प आणि मूळ वैशिष्ट्ये’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी युरोपियन युद्धनौकांपासून ते आतापर्यंतच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित भारतीय युद्धनौकांबाबतचा इतिहास सांगितला. युद्धनौका काळाप्रमाणे कशा बदलत गेल्या, त्या बदलण्यामागे काय कारणे होती, त्यांचे प्रकार कोणते याबाबत त्यांनी सादरीकरण केले.

या वेळी डॉ. खरे म्हणाले, ‘‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क विषयातील नव्या अभ्यासक्रमातून सागरी संरक्षण, सागरी अधिवास, पाण्याखालील ध्वनी, समुद्रातील खाणी, सागरी अर्थकारण, पाण्याखालील वाहतूक असा सागराशी निगडित अभ्यास करणे शक्य होईल. यासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.’’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने दिल्लीस्थित नॅशनल मॅरिटाइम फाउंडेशनबरोबर हा करार करण्यात आला. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘‘विद्यापीठाने यापूर्वी संरक्षण मंत्रालय, सैन्यदल आणि हवाईदल यांच्या तीन स्वतंत्र ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ मिळवल्या आहेत. या सामंजस्य कराराने आता विद्यापीठ नौदलाबरोबरही जोडले गेले आहे. भविष्यात या विषयात अधिक अभ्यासक्रम देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहील.’’
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top