सरळसेवा भरतीबाबत सरकारला उपरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरळसेवा भरतीबाबत सरकारला उपरती
सरळसेवा भरतीबाबत सरकारला उपरती

सरळसेवा भरतीबाबत सरकारला उपरती

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : आरोग्य भरतीतील साडेआठ लाख, म्हाडा भरतीतील एक लाख साठ हजार, शिक्षक भरतीतील तीन लाख ६७ हजार उमेदवारांचे भविष्य अंधारात लोटल्यानंतर, राज्य सरकारला आता उपरती झाली आहे. वादग्रस्त कंपन्यांकडून सरळसेवा भरती करण्याचा अट्टहास सरकारने सोडला असून, एमकेसीएल, टीसीएस आणि आयबीपीएस या अनुभवी कंपन्यांमार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभेतील प्रश्नाला लेखी उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील आरोग्य, गृहनिर्माण, लोहमार्ग पोलिस, तसेच शिक्षण विभागातील सरळसेवा भरती प्रक्रियेतील गैरप्रकार ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणले होते. ऑक्टोबर २०२१ मधील आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ परीक्षेच्या चुकीच्या प्रवेशपत्रांपासून ते फुटलेल्या प्रश्नपत्रीकेपर्यंतचे वार्तांकन ‘सकाळ’ आणि ‘साम’ने केले होते. पेपरफुटीबद्दल टोपे म्हणतात, ‘‘या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलिस तपास सुरु आहे. पेपरफुटी झाल्याने आरोग्य विभागाची सदर परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच गृहनिर्माण विभागाकडून १२ डिसेंबर २०२१ रोजी म्हाडा प्राधिकरणातील रिक्त संवर्गाची पहिल्या टप्प्यातील ऑफलाईन परीक्षा होणार होती. परंतु परीक्षा घेण्यासाठी निश्चित केलेल्या कंपनीकडून सरळसेवा भरती परिक्षेबाबत गोपनीयतेचा भंग केल्याने कंपनी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उमेदवारांचे नुकसान लक्षात घेत सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १८ जानेवारीला निर्गमित केला असून, यापुढील परिक्षा टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.’’ पेपरफुटीमुळे उमेदवारांचे होणारे नुकसान लक्षात घेत शासनाने ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनेल स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे.

तातडीने भरती करा

आरोग्य विभागातील हजारो पदे रिक्त असून, ती तातडीने भरणे आवश्यक आहे. एमकेसीएल, टीसीएस आणि आयबीपीएस कुणाकडूनही परीक्षा घ्या पण तातडीने घ्या, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. आरोग्य भरतीची परीक्षा देणारे कोल्हापूरचे बाजीराव खोत म्हणाले,‘‘आधीच्या परीक्षांमुळे आमचे भविष्यच अंधारात आले आहे. सर्वजण ओरडून सांगत असतानाही सरकारने वादग्रस्त कंपन्या नेमून परीक्षा घेतली. त्याचे परिणामही विद्यार्थी भोगत आहेत. आता उमेदवारांचे पुढील नुकसान टाळण्यासाठी तातडीने परीक्षा घ्यावी.’’ आता सरकारने व्यवस्थित नियोजन करत पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, असे मत किशोर पोपळघट यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..