exam
examsakal

सामाईक प्रवेश परीक्षा वेळेत व्हाव्यात; शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ‘राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रिया परिषद’ आयोजित

पुणे : राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षा वेळेवर आणि सुरळीत होण्यासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे योग्य नियोजन करावे, तसेच कागदपत्रांची मर्यादा कमी करावी, ‘सीईटी सेल’मध्ये पुरेसे मनुष्यबळ कार्यरत असावेत, अशी मते शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (अभाविप) ‘राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रिया परिषद’ आयोजित केली होती. यात सामाईक प्रवेश प्रक्रियेत होणारी दिरंगाई आणि अडचणी याबद्दल चर्चा करण्यात आली. राज्यात अभियांत्रिकी, औषधविज्ञान, वास्तूकला, हॉटेल मॅनेजमेंट याशिवाय एमबीए, एमसीए, विधी, शिक्षणशास्त्र, कृषी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साडेचार लाखांपेक्षा अधिक असून विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षा प्रवेश होण्यापर्यंत विविध तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित केली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले, ‘‘शासकीय विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेच्या तुलनेत खासगी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकर होतात. त्यामुळे हे कोणाच्या भल्यासाठी आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्रित आल्या कारणाने अनेक वेळा विद्यापीठाला परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागते. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेत न लागल्याने प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई होते.’’

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सहजता व सुलभता येण्यासाठी कागदपत्रांची मर्यादा कमी करणे गरजेचे असल्याचे मत शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातील प्रा. गजेंद्र ढमाले यांनी मांडले. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. मुकुंद कुलकर्णी, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे ॲड. नितीन आपटे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे डॉ. अशोक पवार यांनी विचार मांडले. विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल आदी उपस्थित होते.

‘सीईटी सेल’चे काम दिरंगाई चालते, कारण तेथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. राज्य सरकारने तत्काळ ‘सीईटी सेल’साठी मनुष्यबळ पुरवावे आणि काम अद्ययावत करावे.
-डॉ. विलास नंदवाडेकर, माजी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com