कुमार गटासाठी नव्या पुस्तकांचा ठेवा

कुमार गटासाठी नव्या पुस्तकांचा ठेवा

पुणे, ता. १२ ः कुमारांसाठी दर्जेदार आणि सकस साहित्य निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या छात्र प्रबोधनतर्फे सात नव्या पुस्तकांचा ठेवा वाचकांच्या भेटीला आला आहे. प्रवीण दवणे, भारत सासणे, सुहासिनी देशपांडे अशा दिग्गज लेखकांनी लिहिलेल्या वैविध्यपूर्ण विषयांवरील कथा, ललित लेखांचा समावेश असणाऱ्या या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच झाले.

ज्ञान प्रबोधिनीद्वारा कुमारांसाठी प्रकाशित होणाऱ्या ‘छात्र प्रबोधन’ मासिकाचे हे तिसावे वर्ष आहे. त्यानिमित्ताने येत्या वर्षभरात वीस पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा संस्थेचा मानस असून, यातील सात पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या पुस्तकांमध्ये कविता मेहेंदळे लिखित ‘तू मोठ्ठा कधी रे झालास’, प्रवीण दवणे लिखित ‘जिद्दीची गुरुकिल्ली’, सुहासिनी देशपांडे लिखित ‘मृदू भाव जागे होता’ आणि ‘किमयागार’, आश्लेषा महाजन लिखित ‘विंचू चावला हो’, अंजली कुलकर्णी लिखित ‘जपून ठेवू सृष्टी... नाती’ आणि भारत सासणे लिखित ‘राम आणि श्यामच्या अद्भुत साहस यात्रा’ या पुस्तकांचा समावेश होता. ज्येष्ठ लेखक मल्हार अरणकल्ले, भारत सासणे, अरुणा ढेरे, संगीता बर्वे, स्वाती राजे, किरण केंद्रे आणि आश्लेषा महाजन यांच्या हस्ते ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली.

यावेळी छात्र प्रबोधनचे महेंद्र सेठिया म्हणाले, ‘‘छात्र प्रबोधनने गेल्या तीस वर्षांत सुमारे चौदा हजार पाने प्रकाशित केली आहेत. ही सर्व पाने डीव्हीडीवर उपलब्ध आहेत. ही पाने ॲपच्या माध्यमातून येत्या वर्षभरात उपलब्ध करून देण्याची योजना आहे. याला दृकश्राव्य माध्यमाची जोड देण्याचाही प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे येत्या काही वर्षांत हिंदी आणि इंग्रजी भाषेतही छात्र प्रबोधनचे दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे संस्थेने ठरवले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com