फ्लेक्सबाजीविरुद्ध आवाऽऽज...

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर किंवा गल्लीबोळात सातत्याने अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात येत असल्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ असा लौकिक असलेले पुणे शहर दिवसेंदिवस विद्रूप होत आहे.
Pune Flex
Pune FlexSakal
Summary

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर किंवा गल्लीबोळात सातत्याने अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात येत असल्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ असा लौकिक असलेले पुणे शहर दिवसेंदिवस विद्रूप होत आहे.

पुणे - पुणे शहरातील (Pune City) प्रमुख रस्त्यांवर किंवा गल्लीबोळात सातत्याने अनधिकृत फ्लेक्स (Illegal Flex) उभारण्यात येत असल्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ (Smart City) असा लौकिक असलेले पुणे शहर दिवसेंदिवस विद्रूप होत आहे. त्यामुळे अनधिकृत फ्लेक्सबाबत ‘सकाळ’ (Sakal) सातत्याने आवाज उठवत आहे. त्याला पुणेकरांचाही मोठा प्रतिसाद (Response) मिळत आहे. महापालिकेनेही (Municipal) धीम्या गतीने का होईना, कारवाई (Crime) सुरू केली आहे. परंतु, लावलेले फ्लेक्स काढण्यापेक्षा अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी धोरण तयार करा आणि पुण्यातून फ्लेक्स कायमचेच हद्दपार करा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याची दखल महापालिकेने घ्यावी आणि त्वरित अंमलबजावणी करावी, अशी शिक्षण, वैद्यकीय, विधी, होर्डिंग क्षेत्रांतूनही मागणी होत आहे.

फ्लेक्स विरोधात ‘वकिली’

चौका चौकातील राजकीय व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही निमित्ताने सेलिब्रेशन करण्याची पद्धत गेल्या काही दिवसांत वाढली आहे. त्यातून अनधिकृत फ्लेक्सबाजी केली जाते. त्यामुळे विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच परवानगी देण्यात आलेल्या फ्लेक्सचे देखील ऑडिट होणे गरजेचे आहे, असे पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे यांनी सांगितले. अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी करून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. आपल्या कोणत्याही कृत्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होणार नाही हे प्रत्येकाचे काम आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्येकाने स्वतःपासून करावी, असे महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिल असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले.

शिक्षणतज्ज्ञांनी घेतली राजकारण्यांची ‘शाळा’

शहरात, महामार्गावर जागोजागी लागणाऱ्या फ्लेक्समध्ये जवळपास ९० ते ९५ टक्के फ्लेक्स हे राजकीय असतात. फ्लेक्समुळे शहर आणि परिसराचे विद्रूपीकरण होत असले, तरीही फ्लेक्स हे कायमस्वरूपी हटविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीच हवी. त्याशिवाय फ्लेक्स लावणाऱ्यांना, त्याची गरज भासणाऱ्यांना अन्य पर्याय उपलब्ध करून द्यायला हवे आणि त्याबाबत ‘लोकशिक्षण’ गरजेचे आहे, असे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सुचविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महासंघाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले म्हणाले, ‘शहर सुशोभीकरणबाबत कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन उपाययोजना करण्यात येतात. परंतु फ्लेक्समुळे हे सुशोभीकरण झाकले जाते. अनेकदा फ्लेक्स हे राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लावले जातात. पण, त्यामुळे तेथून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अनावश्यक फ्लेक्सचा मारा होऊ नये, म्हणून अन्य पर्यायाचा वापर करणे गरजेचे आहे.’’ शिक्षण सुधारणा मोहिमेचे (सिस्कॉम) अध्यक्ष राजेंद्र धारणकर म्हणाले, ‘शहरातील वाहतुकीस, रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या, तसेच अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. फ्लेक्सबाबत प्रशासनाने ठोस मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी पावले उचलावीत.’’

सुचविलेले उपाय

  • फ्लेक्सबाबत मार्गदर्शक सूचना तयार करून कार्यान्वित व्हाव्यात

  • अनधिकृत आणि धोकादायक फ्लेक्सवर कडक कारवाई करावी

  • ‘फ्लेक्स’ला पर्याय शोधण्याचे आव्हान स्वीकारावे

  • फ्लेक्स लावणाऱ्यांमध्ये ‘लोकशिक्षण’ हवे

  • प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी

वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही फ्लेक्सबाजीचे ‘पोस्टमार्टेम’

वाटेल तिथे काठ्या लावायच्या आणि त्यावर फ्लेक्स लटकवायचे हे धंदे कायमस्वरूपी थांबले पाहिजे. यातून महापालिकेला महसूल मिळत नाहीच, पण शहराचे मात्र विद्रूपीकरण होते. त्यामुळे फ्लेक्सबाजीतून होणारे शहराचे विद्रूपीकरण थांबलच पाहिजे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय तज्ज्ञांच्या संघटनांकडून देण्यात आली. ‘सकाळ’तर्फे गेल्या आठवड्यापासून अनधिकृत फ्लेक्सबद्दल जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्याचं स्वागत वैद्यकीय तज्ज्ञांच्या संघटनांनी केले. त्या बद्दल बोलताना ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) पुणे शाखेचे सचिव डॉ. सुनील इंगळे म्हणाले, ‘‘फ्लेक्सचा उपयोग राजकारणासाठी करून शहराला विद्रूप करण्याचा प्रयत्न जागोजागी झालेला दिसतो. छोट्या-छोट्या मुलांच्या वाढदिवसापासून ते हळदी-कुंकुपर्यंतचे फ्लेक्स लावले जातात. भविष्यातील महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने हे फ्लेक्स लावले जातात. त्यात शहराच्या सौंदर्याचा कुठेही विचार होत नाही. फ्लेक्स लावणाऱ्यांना फक्त लोकांच्या नजरेत राहायचं असतं, असं दिसतं. सिग्नलसमोर फ्लेक्स लावले जातात. सिंग्नल दिसत नाही, याचंही भान ठेवलं जात नाही. आता नव्याने उभारले जाणारे उड्डाण पुलावरही फ्लेक्स लावले जातात. यातून शहराचं फक्त विद्रूपीकरण होते.’’

पुणे शहराच्या सौंदर्याला अनधिकृत फ्लेक्स हा मोठा अडथळा ठरत आहेत. फेक्समुळे सिग्नल दिसत नसल्याने वाहनांचे अपघात होण्याचा नवीन धोका आता निर्माण झाला आहे.

- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, पुणे शाखा, हॉस्पिटल बोर्ड असोसिएशन (इंडियन मेडिकल असोसिएशन)

महापालिकेतील अधिकारी ठोस भूमिका घेत नाहीत. त्याचा नाहक त्रास नियमित कर भरणाऱ्या पुणेकरांना होतो. त्यामुळे अनधिकृत फ्लेक्स काढून शहराचे सौंदर्य पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे.

- डॉ. सचिन गांधी, वैद्यकीय तज्ज्ञ

होर्डिंग व्यावसायिकही नाराज

महापालिकेने मनात आणले आणि लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवले तर, शहर विद्रूप होण्याचे थांबेल. तसेच पोलिसांनीही या बाबतच्या तक्रारीची दखल तत्परतेने घेतली तर, अनधिकृत फ्लेक्सबाजी थांबवता येईल, होर्डिंग व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

फ्लेक्स प्रिंटर्सला आणि मंडप व्यावसायिकांना महापालिकाच लायसन्स देते. त्यांच्यावरच नियंत्रण आणले तर फ्लेक्सबाजी निश्चितच कमी होईल, तसेच होर्डिंग्जवर अनधिकृत फ्लेक्स चिकटविणाऱ्यांवर जरब बसेल, अशी कारवाई पोलिसांकडून होणे आवश्यक आहे.

- चंद्रकांत कुडाळ, माजी अध्यक्ष, पुणे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन

अनधिकृत फ्लेक्सला महापालिकेचेच अधिकारी खतपाणी घालतात. पोलिसांकडे तक्रार केली तरी पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे अधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेत पैसे भरूनही त्रास होतो.

- बाळासाहेब गांजवे, अध्यक्ष, पुणे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन

मुळात अनधिकृत फ्लेक्स लावणे हे बेकायदा आहे. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन अगदी जीव जाण्याचादेखील धोका असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे सर्व अनधिकृत फ्लेक्स हटविणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘सकाळ’ने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे.

- ॲड. राजेंद्र उमाप, उपाध्यक्ष, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिल असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com