
बदलत्या वातावरणामुळे वाढले ताप-सर्दीचे रुग्ण
पुणे - उन्हाचा (Summer) वाढलेला चटका वाढत असतानाच अचानक ढगाळ वातावरण (Environment) निर्माण झाले. त्यातून पावसाच्या हलक्या सरी पडल्या. उन्हाची लाही कमी झाली. या सगळ्या वातावरणीय बदलाचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर (Health) झाला. गेल्या आठवड्यापासून शहरात ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. ही सर्व लक्षणे कोरोनाची असली तरीही बहुतांश रुग्णांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे प्रयोगशाळेतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.
शहरात मार्चच्या सुरवातीपासून कमाल तापमानाचा पारा सातत्याने वाढत होता. होळीपर्यंत दिवसाचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. त्यामुळे पुणेकरांनी सनकोट, टोप, गॉगल्स वापरून दैनंदिन कामे करत असल्याचे चित्र रस्त्या-रस्त्यांवर दिसत होते. मात्र, याच दरम्यान अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. चार ते पाच दिवस हे ढगाळ वातावरण होते. शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरीही लावली. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा घसरला. या वातावरणातील बदलामुळे हवेत विषाणूजन्य आजारांचा फैलाव वाढतो. त्यामुळे शहरातील सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर ताप, सर्दीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण, गेल्या आठवड्यापासून तापाबरोबरच सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यातही लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी आहे.
- डॉ. राहुल कदम
ताप, सर्दी, खोकला ही कोरोनाचीदेखिल लक्षणे आहेत. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. पण, त्यापैकी बहुतांश रुग्णांना कोरोना नसल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळे नियमित औषधे, विश्रांती आणि भरपूर पाणी यातून रुग्ण चार ते पाच दिवसांमध्ये बरा होतो.
- डॉ. बी. डी. गायकवाड
हे करा
- ताजे पदार्थ जेवणात घ्या
- काकडी, कांदा, टोमॅटो, पुदीना ताटात वाढून घ्या
- कलिंगड, टरबूज, खरबूज, द्राक्षे अशा पाणीदार फळांचा आहार समावेश करा
- भरपूर पाणी प्या
हे टाळा
- मसाल्याचे पदार्थ
- जंक फूड
- चहा, कॉफी असे उष्ण द्रव पदार्थ
- मांसाहार
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..