
व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचा पुस्तके! व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचा पुस्तके!
पुणे, ता. २२ ः ‘आज मुलांसमोर पुस्तकांना पर्याय म्हणून टीव्ही, मोबाईल, टॅब्लेट अशी अनेक साधने उपलब्ध आहेत. पुस्तकांतून होणारी मुलांची सर्वांगीण जडणघडण या साधंनामधून होणे शक्य होत नाही. ही साधने पुस्तकांना पर्याय ठरू शकत नाहीत. त्यामुळे मुलांनो, तंत्रज्ञानाचा वापर कराच, मात्र व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तके वाचाच’, असा सल्ला बाल साहित्यिक आणि संपादकांनी ‘जागतिक पुस्तक दिना’च्या निमित्ताने ‘सकाळ’शी बोलताना दिला.
बाल साहित्यासाठी २०२१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले लेखक संजय वाघ म्हणाले, ‘‘पुस्तक ही मित्रांप्रमाणे असतात, असे म्हणतात. खरोखर मित्रांप्रमाणे ते प्रत्येक पावलावर साथ देतात. तसेच, शिक्षकांची भूमिकाही ते पार पाडत असतात. कितीही आधुनिकीकरण झाले, तरी पुस्तकांना पर्याय उभा राहणे, जवळपास अशक्य वाटते. आज तंत्रज्ञानाचा पर्याय उभा राहिला असला तरी त्याच्या तोट्यांमुळे पुस्तके कधीही उजवी ठरतात. त्यामुळे मुले पुस्तके सोडून स्क्रीनकडे वळणार नाहीत, असा विश्वास वाटतो.’’
कुमारांसाठीच्या साहित्य निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘छात्र प्रबोधन’चे संपादक महेंद्र सेठिया म्हणाले, ‘‘शहरी भागात तंत्रज्ञानाचा प्रसार बऱ्यापैकी झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही पुस्तकांना पर्याय नाही. तसेच, शहरी भागातही खर्चिकता, विजेची उपलब्धता, तंत्रज्ञान व साधनांची उपलब्धता आदी अडथळ्यांमुळे तंत्रज्ञानालाही मर्यादा आहेत. तंत्रज्ञान पुस्तकांना पर्याय उभे करत नाही, हे काही अंशी खरे आहे. मात्र नावीन्यपूर्ण प्रयोग करून मुलांना पुस्तक वाचनाची गोडी लावणे सहज शक्य आहे. त्यामुळे येत्या दहा-वीस वर्षांत तरी पुस्तकांना पर्याय उभा राहू शकत नाही.’’
कोरोना काळात अनेक ग्रंथालये, प्रकाशन संस्थांना अडचणींचा सामना करावा लागला. पुस्तकांची विक्री होत नव्हती. मात्र बालवाङ्मयाची उत्तम विक्री होत होती. मुलांना सर्जनशील गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी पालकांनी पुस्तकांनाच प्राधान्य दिले. त्यामुळे कोरोना काळानंतर बालवाङ्मयाच्या निर्मितीत दुप्पट वाढ झाली आहे. हे चित्र उत्साहवर्धक आहे. तसेच, पुस्तकांना पर्याय नाही, हीच बाब अधोरेखित करणारे आहे.
- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ
पुस्तक वाचनाचे फायदे
- मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास
- कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत
- शब्दसंग्रहात वाढ
- एकाग्रतेत वाढ
- भाषेचे उत्तम आकलन होण्यास मदत
- माहिती नाही तर, ज्ञानात पडते भर
- दूरगामी प्रभाव पाडणारे साधन
मुलांनो, ही पुस्तके वाचाच
१) दस नंबरी फोन - राजीव तांबे
२) समशेर आणि परग्रहावरचा माणूस - भारत सासणे
३) तू मोठ्ठा कधी रे झालास - कविता मेहेंदळे
४) अंतरिक्षातील शेजारी - रेखा बैजल
५) जोकर बनला किंगमेकर - संजय वाघ
६) देवराई - रमा हर्डीकर
७) आबाची गोष्ट - आबा महाजन
८) आपला भारत भाग १ ते २५ - राजा मंगळवेढेकर
९) विंचू चावला हो - आश्लेषा महाजन
१०) जिद्दीची गुरुकिल्ली - प्रवीण दवणे
११) शब्दांची नवलाई - एकनाथ आव्हाड
१२) गोष्टीमागच्या गोष्टी - मृणालिनी वनारसे
१३) गिरिजाताईंच्या गोष्टी भाग १ ते १० - गिरिजा कीर
१४) झाड आजोबा - संगीता बर्वे
१५) अलगट्टी गालगट्टी - अंबरिश मिश्र
१६) आधुनिक स्फूर्तीकथा - श्रुती पानसे
१७) मृदू भाव जागे होता - सुहासिनी देशपांडे
१८) यशच्या कल्पककथा - डॉ. अश्विनी धोंगडे
१९) बाराखडीच्या कविता - वसुधा पाटील
२०) जपून ठेवू सृष्टी... नाती - अंजली कुलकर्णी
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..