बहुतांश वणवे मानवी कारणांमुळेच

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एन. आर. प्रवीण यांचे वणवा परिषदेत प्रतिपादन

बहुतांश वणवे मानवी कारणांमुळेच मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एन. आर. प्रवीण यांचे वणवा परिषदेत प्रतिपादन

Published on

पुणे, ता. २१ : ‘‘राज्यातील बहुतांश वणवे हे केवळ मानवी कारणांमुळेच लागत आहेत. नैसर्गिक कारणांमुळे लागणाऱ्या वणव्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. वणव्यांमुळे केवळ वनक्षेत्र किंवा तेथील जैवविविधताच नाही तर कृषी क्षेत्राला ही मोठा फटका बसतो,’’ असे मत पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एन. आर. प्रवीण यांनी व्‍यक्‍त केले.

पुणे वन विभागाच्या वतीने आयोजित ‘वन वणवा परिषद २०२२’ दरम्यान ते बोलत होते. जिल्ह्यात लागणाऱ्या वन वणव्यांच्या घटनांच्या पार्श्र्वभूमीवर उपाययोजनांचा भाग म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वन संरक्षक व क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी आणि पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये वन विभागातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सरपंच, ग्रामसेवक, ग्राम व्यवस्थापन समिती सदस्य, वन व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी आदींनी सहभाग घेतला होता.

बॅनर्जी यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात वणवे प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. मेळघाट वनक्षेत्रात वणव्यांची माहिती मिळवणे, संनियंत्रण करणे तसेच वणवे प्रतिबंधासाठी पारंपरिक उपाययोजनांसह लागलेले वणवे नियंत्रणात आणण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. तेथे आग प्रतिबंधक कक्ष (फायर सेल) स्थापन केला असून, नासाचा उपग्रह, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याकडून वणव्याची माहिती (अलर्ट) येताच तत्काळ आग प्रतिबंधाचे काम सुरू होते. या पद्धतीने काम केल्यामुळे मेळघाट क्षेत्रातील वणव्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

पुणे विभागात सुमारे ४० टक्के वनक्षेत्र हे वन विभागाच्या हद्दीतील असून, अन्य वनक्षेत्र जिल्हा परिषद, महापालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील असून, काही वनक्षेत्र खासगी आहे. त्यामुळे वणवे प्रतिबंधासाठी या सर्व यंत्रणांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

जिल्ह्यातील वणव्यांचा आढावा
वर्ष : वणव्यांची संख्या
२०२० : ३९१
२०२१ : ३९७
२०२२ (२२ एप्रिलपर्यंत) : ६५

या विषयांवर केला जाणार विचार
- फायर वॉचची सुविधा
- आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करणे
- आधुनिक उपकरणांचा वापर व समावेश
- वणवे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची यंत्रणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com