
‘डिजिटल डिटॉक्स’ची वाढती गरज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यकता
पुणे, ता. २१ : सकाळी उठताक्षणी आणि रात्री झोपेपर्यंत ‘मोबाईल’ हातातून सुटतच नाही. त्यात प्रत्येक मिनिटाला अपडेट चेक करण्यापासून ते फोटो, व्हीडिओला किती लाइक मिळाले यावर सतत नजरा, त्यामुळे नकळतपणे या डिजिटल जाळ्यात प्रत्येक जण अडकत आहे. परिणामी, मानसिक ताण, चिडचिड, झोप न लागणे, कामात लक्ष न लागणे, आळस, कंटाळा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. तुम्हाला पण अशी लक्षणे असतील तर इकडे लक्ष द्या. वेळ आली आहे आता ‘डिजिटल डिटॉक्स’ची. ज्यामुळे तुमचे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यदेखील उत्तम राहिल.
‘डिजिटल डिटॉक्स’ आहे तरी काय?
लॅपटॉप, मोबाईल, आयपॅड सारख्या डिजिटल उपकरणांचा कमीतकमी वापर किंवा वापरणे बंद करणे म्हणजेच ‘डिजिटल डिटॉक्स’. या उपकरणांचा सर्वाधिक वापर होण्याचे कारण म्हणजेच समाजमाध्यम. दिवसातील सर्वाधिक वेळ हा समाजमाध्यमांवर घालविल्याने अनेकांना त्याचे व्यसन लागले आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ हा एकमेव आणि उत्तम पर्याय आहे.
का आहे डिजिटल डिटॉक्सची गरज?
कोरोनाकाळात लॉकडाउनमुळे अनेकांनी फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, ट्वीटर तसेच इतर समाजमाध्यमांच्या वापरावर भर दिला. घरातील मोठ्यांप्रमाणेच लहानग्यांमध्येही ही सवय रुजू लागली आहे. आपल्या पोस्टला किती लोकांनी लाइक केले, त्यावर काय कमेंट आल्या, आपली लोकप्रियता वाढत आहे का? अशा विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी समाजमाध्यमांवर तासनतास घालविण्यात येत आहेत. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, अलीकडे हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मानसोपचारतज्ज्ञ, फिटनेस क्षेत्रातील तज्ज्ञ, डिजिटल डिटॉक्स अंमलात आणण्यावर भर देत आहेत.
कोणतीही विषारी गोष्ट शरिरासाठी हानिकारक असते. तसेच सध्या समाजमाध्यमांचे झाले आहे. याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. ‘डिजिटल डिटॉक्स’मुळे प्रत्येकामध्ये समाजमाध्यमांशी निगडित सेल्फ कंट्रोल (स्वयंशिस्त) वाढेल. कोरोनाकाळात ऑनलाइन अभ्यास प्रणालीमुळे लहानमुलांच्याही हातात मोबाईल पोचला. आता मात्र शाळा पुन्हा सुरू झाल्याने या संधीचा वापर करत पालकांनी मुलांच्या डिजिटल गॅजेटच्या वापरावर मर्यादा घालणे गरजेचे आहे.
डॉ. अनघा लव्हाळे, मानसोपचारतज्ज्ञ
‘डिजिटल डिटॉक्स’साठी हे कराच
- मोबाईल फोनचा केवळ गरजेनुसार वापर
- दररोज ‘टेक फ्री टाइम’ असा काही तासांचा वेळ निश्चित करा
- जेवताना फोनचा वापर सक्तीने टाळा
- फोनवर सतत येणारे नोटिफिकेशन थांबवावेत
- मोकळ्या वेळेत ‘इंटरनेट सर्फिंग’ऐवजी, आपले छंद जोपासणे
- व्यक्त होण्यासाठी लिखाणाचाही पर्याय निवडा
पालकांनो हे करा
- मुलांना पुस्तके वाचायला द्या
- त्यांना मोबाईलपासून लांब ठेवा
- त्यांच्याशी संवाद वाढविणे, त्यांना खेळांमध्ये किंवा इतर कलात्मक गोष्टींमध्ये गुंतवणे
- बाहेर भ्रमंतीला घेऊन जाणे
- स्क्रीनटाइम कमी करणे
समाज माध्यमांवरील विखारी घटक
- ट्रोलिंग
- एकमेकांच्या पोस्टवर चुकीचे किंवा वाईट लिहून निशाणा साधणे
- पोस्ट डिसलाइक करणे
- समाजमाध्यमांतून चुकीची माहिती पसरविणे
समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ (स्त्रोत : केपीओस ॲनॅलिसिस)
- २०२१ ते २०२२मध्ये समाजमाध्यमाच्या वापरकर्त्यांमध्ये देशातील १.९ कोटी लोकसंख्येची नव्याने वाढ
- २०२२ च्या सुरुवातीपर्यंत यूट्यूब वापरकर्त्यांची संख्या ४६ कोटी
७० लाख
- इन्स्टाग्रामचे वापरकर्ते २३ कोटी
- फेसबुक मेसेंजर वापरकर्त्यांची संख्या १२ कोटी २५ लाख
- लिंक्डइनचा वापर सुमारे ८ कोटी लोकांकडून
- स्नॅपचॅट वापरकर्त्यांची संख्या १२ कोटी ६० लाख
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..