परस्पर संमतीने जोडप्याचा घटस्फोट तीन दिवसांत मंजूर

परस्पर संमतीने जोडप्याचा घटस्फोट तीन दिवसांत मंजूर

पुणे, ता. ४ : वैचारिक मतभेदामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून सव्वातीन वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या उच्च शिक्षित दांपत्याचा घटस्फोटाचा दावा न्यायालयाने अवघ्या तीन दिवसांत निकाली काढला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एच. के. गणात्रा यांनी हा दावा मंजूर केला.

परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी पती-पत्नी १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या न्याय-निवाड्याचा आधार घेत या जोडप्याचा दावा तीन दिवसांत निकाली काढला. अक्षय व प्रतीक्षा (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. वाद निर्माण झाल्याने ते गेली सव्वातीन वर्षे वेगळे राहत आहेत. दोघेही उच्चशिक्षित आहेत. प्रतीक्षा पुण्यात व्यावसायिक आहे, तर अक्षय कतारमध्ये नोकरी करतो. २०१५ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांना मूलबाळ नाही. वाद झाल्यानंतर ते नोव्हेंबर २०१८ पासून दोघे वेगळे राहत आहेत. वेगळे राहायला सुरुवात केल्यानंतर अक्षय कतारमध्ये गेला होता. घटस्फोटाच्या दाव्यासाठी तो कतारहून पुण्यात आला होता. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. दोघांनी ॲड. विनोद अंबाड, ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. आकांक्षा दांडगे आणि ॲड. अक्षय भालेराव यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

‘‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा संदर्भ आम्ही न्यायालयात दिला. त्यानुसार न्यायालयाने हा दावा निकाली काढला. दोघेही सव्वातीन वर्षांपासून वेगळे राहत होते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते.’’
- ॲड. विनोद अंबाड, दांपत्याचे वकील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com