
दहावी-बारावी परीक्षा दरवर्षीप्रमाणेच
पुणे, ता. ९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियोजनानुसार दहावी-बारावीच्या २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेण्याचा विचार आहे. प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव मंडळाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. लवकरच या प्रस्तावावर निर्णय होणे अपेक्षित आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मूल्यांकनाची कोणती पद्धती ठरवावी, याची चाचपणी सुरू मंडळाकडून सुरू आहे.
कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरियंटमुळे दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच घेण्यावर ठाम असल्याचे मंडळाने कळविले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मध्यंतरी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सहविचार सभा घेतली होती. या सभेत झालेल्या चर्चेनुसार प्रचलित पद्धतीनुसारच आणि गेल्या वर्षी कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रम वगळूनच उरलेल्या भागावर परीक्षा होतील, हे निश्चित करण्यात आले. याला वरिष्ठ कार्यालयानेदेखील सहमती दर्शविली असून, मंडळानेही दुजोरा दिला आहे. या परीक्षासंदर्भात राज्य मंडळाने सादर केलेल्या प्रस्तावावर येत्या आठवड्याभरात राज्य सरकार निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणेच प्रचलित पद्धतीने दहावी-बारावीची परीक्षा घेण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. त्याशिवाय परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२२ या कालावधीतच घेण्याचा मंडळाचा विचार असून, त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
‘स्वयंघोषित तज्ज्ञांनी दिशाभूल करू नये’
‘‘काही स्वयंघोषित शिक्षण तज्ज्ञ आणि खासगी व्यक्ती परीक्षा पद्धतीमधील बदल होणार आणि अभ्यासक्रम अजून कमी होणार, अशी दिशाभूल करणारी बेजबाबदार विधाने करत आहेत. यावर कोणताही विश्वास न ठेवता मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी-पालक यांनी राज्य मंडळाकडून येणाऱ्या माहिती ग्राह्य धरावी,’’ असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी केले आहे.
‘‘दहावी-बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर सादर केला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मूल्यांकनाची पद्धत कोणती असावी, याची चाचपणी सुरू आहे. परंतु, परीक्षा या प्रचलित पद्धतीने घेण्याचाच विचार आहे.’’
- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..