

बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्राला अवकळा
--
रिक्त पदांचे ग्रहण; निधी, मनुष्यबळाअभावी प्रक्षेत्रावरील मोसंबी बाग धोक्यात
संतोष मुंढे : ॲग्रोवन वृत्तसेवा
जालना : मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे बदनापूर (जि. जालना) येथील मोसंबी संशोधन केंद्र मनुष्यबळ, निधी आणि मूलभूत सुविधांच्या तीव्र कमतरतेमुळे अडचणीत आले आहे. अनेक वर्षांपासून रिक्त पदे न भरल्याने संशोधन कार्यावर परिणाम झाला असून, केंद्राच्या प्रक्षेत्रावरील सुमारे ५०० झाडांची मोसंबी बागही काढण्याची वेळ आली आहे.
मराठवाड्यातील वाढत्या मोसंबी क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर २००६ मध्ये या संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी सुमारे ५०० झाडांची मोसंबी बाग उभारण्यात आली होती. मोसंबी पिकातील दर्जावाढ, कीड व रोग व्यवस्थापन, फळ प्रक्रिया आणि विभागनिहाय तग धरणाऱ्या सुधारित जाती विकसित करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले होते.
मात्र आवश्यक मनुष्यबळ, संशोधनासाठीचा निधी आणि मूलभूत सुविधांचा सातत्याने अभाव राहिल्याने केंद्राचे कामकाज मर्यादित स्वरूपातच सुरू आहे. अलीकडेच नवीन आकृतिबंध मंजूर झाला असला, तरी त्यानुसार आवश्यक पदे, सुविधा आणि महसुली निधी उपलब्ध होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
बाग काढण्याची वेळ; संरक्षक भिंतीचीही पडझड
सुमारे १८.४० हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रातील मोसंबी बाग सध्या जीर्ण अवस्थेत आहे. जालना- छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या या बागेतील झाडे संकटग्रस्त झाली असून, ती काढून नव्याने लागवड करण्याचे नियोजन आहे.
केंद्राभोवतीची संरक्षक भिंतही अनेक ठिकाणी पडझड झालेल्या अवस्थेत आहे. याशिवाय सिंचनासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नसल्याने नव्याने लागवड केली तरी ती टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेततळ्यासह सिंचनाची शाश्वत व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.
६५ टक्के मनुष्यबळाची कमतरता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सुमारे ६५ टक्के मनुष्यबळाची कमतरता असल्याचा फटका या केंद्रालाही बसला आहे. सध्या केंद्रावर केवळ एकच प्रमुख कार्यरत असून, त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्र, सिट्रस इस्टेट, तसेच कृषी महाविद्यालयातील मार्गदर्शनाची अतिरिक्त जबाबदारी आहे.
केंद्रातील सहायक प्राध्यापकांची दोन पदे रिक्त आहेत. कृषी अधिकारी अध्ययन रजेवर असून कृषी पर्यवेक्षक प्रतिनियुक्तीवर आहेत. कृषी सहायकांची चार पदे गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे सध्या एक प्रमुख, एक वरिष्ठ लिपिक, एक कनिष्ठ लिपिक आणि दोन मजूर यांच्या भरवशावर केंद्राचा कारभार सुरू आहे.
---
प्रतिक्रिया
नवीन मंजूर झालेल्या आकृतिबंधानुसार आवश्यक मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या संकटग्रस्त झालेली मोसंबी बाग काढून त्या ठिकाणी नव्याने लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- डॉ. संजय पाटील, प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर
फोटो ओळ :
जालना : बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राची इमारत आणि प्रक्षेत्रातील वाळलेली मोसंबी बाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.