

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्या
वैभव पिचड ः राजूरमध्ये पुन्हा बैलबाजार सुरु
अकोले, ता. ९ : यंदा डांगी जनावरांचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर भरविण्याचा मानस आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन बाजारपेठेच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुका येतील आणि जातील; मात्र राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे,असे प्रतिपादन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.
गेल्या वर्षभरापासून बंद असलेला राजूर येथील आठवडे बैल व जनावरांचा बाजार अखेर पुन्हा सुरू झाला आहे. माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी घोटी, सिन्नर, चाकण येथे जावे लागत होते. आता राजूरमध्ये बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या वेळी सचिन देशमुख, बाळासाहेब सावंत, माजी सरपंच गणपत देशमुख, किशोर देशमुख, यादव देशमुख, किरण कानकाटे, सयाजी अस्वले, भरत घाणे, मनोहर गवारी, गंगाराम धिंदळे, शिवदास महाराज झोळेकर, ओंकार नवाळी, नामदेव भांगरे, देवराम देशमुख, अरविंद देशमुख, पोपट मुतडक, बाबा खाटीक, जावेद खाटीक, तबाजी झोळेकर, दत्ता वालझाडे आदी उपस्थित होते.
पिचड म्हणाले, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून घेत तालुक्यात हरितक्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करू. डांगी जनावरे, धान्य बाजार, भाजीपाला बाजार अशा विविध बाजारपेठा विकसित करून शेतकऱ्यांच्या हाताला आर्थिक बळ देण्याचे काम केले जाईल. राज्यात आणि तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असली, तरी स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी तालुक्यात पाणी अडविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण झाली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना चारा आणि पाण्याच्या बाबतीत काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. दुष्काळात जनावरे सांभाळण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असताना बैलबाजार सुरू झाल्याने जनावरांच्या खरेदी-विक्रीची सोय स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.
प्रभारी सरपंच संतोष बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या स्मरणार्थ उपस्थित शेतकऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
-----
बाजाराच्या यशस्वी संचालनासाठी समितीच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था बाजार समिती करेल.
भानुदास तिकांडे, सभापती, बाजार समिती अकोले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.