संत भोजलिंग काका महामंडळाची लवकरच स्थापना
आळंदी, ता. २४ : ‘‘सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून ५० कोटींचा निधी तातडीने मंजूर केला जाईल,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिले.
विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आळंदीमध्ये आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश लांडगे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, शिवसेना (शिंदे गट) पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, विश्वकर्मीय सुतार समाजाचे मुख्य प्रशासकीय राज्य समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर, पी. जी. सुतार, राज्य समन्वयक दिलीप अकोटकर, हनुमंत पांचाळ, रवींद्र सुतार, प्रदीप जानवे, आनंद मिस्त्री, विजय रायमूलकर, भगवान राऊत, संजय बोराडे, नारायण क्षीरसागर, गणपत गायकवाड, अरुण सुतार, अर्जुन सुतार, विलास भालेराव, नारायण भागवत, भगवान श्राद्धे, प्रकाश बापर्डेकर आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘सुतार समाजाच्या १३ मागण्यांपैकी महामंडळ स्थापनेची घोषणा आजच करतो, तर उर्वरित १२ मागण्यांसाठी एक स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’’ मानकर म्हणाले, ‘‘सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासाठी किमान ५० कोटींची तरतूद करावी, केंद्रीय आर्टिझन शिष्यवृत्ती योजना पाल्यांना विनाअट लागू करावी, पिढ्यान् पिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक किल्ले, महाल, वास्तू तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत. या ऐतिहासिक वास्तूंद्वारे सरकारकडे जो महसूल जमा होतो, त्यातून किमान २५ टक्के वाटा पारंपरिक कारागिरांना द्यावा.’’
लांडगे म्हणाले, ‘‘सुतार समाजाने विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचा लाभ घेऊन स्वतःला सक्षम करावे. समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाठपुरावा करेन.’’ रायमुलकर म्हणाले, ‘‘सामाजिक समस्या सोडविण्यासाठी समाजाने एकत्रित आले पाहिजे, तरच आमच्यासारखे नेते झुकतात. शासनाकडून आपल्या समाजाच्या जास्तीत जास्त मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा माझा प्रयत्न राहील.’’ महामेळाव्यास राज्यभरातील नागरिक उपस्थित होते. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. गणपत गायकवाड यांनी आभार मानले.
बाल वारकऱ्यांसह दिंडी :
मेळाव्याच्या उद्घाटनापूर्वी संतोष महाराज ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतून बाल वारकऱ्यांसह संत भोजलिंग काका प्रासादिक दिंडी काढण्यात आली. ज्ञानेश्वर माउली देवस्थान ट्रस्टला दोन किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्याबद्दल दत्तात्रेय सुतार (इचलकरंजी) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.