खेड तालुक्यातील तिर्थक्षेत्र
खेड तालुक्यात तीर्थक्षेत्रांची मांदियाळी
संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।।
या प्रमाणानुसार भागवत धर्माचे मूळ अधिष्ठान असलेले संत ज्ञानेश्वर माउली, जगद्गुरू संत तुकाराम, संताजी महाराज जगनाडे, स्वातंत्र्याच्या युद्धात आहुती देणारे थोर क्रांतिकारक राजगुरू यांच्या पावनभूमीची ओळख असलेला खेड तालुका आहे. संतांचे शांती, समता, एकता आणि क्रांतिकारकांची देशप्रेमाची भावना येथे रुजलेली, एकवटलेली आहे. खेड तालुक्याची शेतकरी, कष्टकरी म्हणून ओळख आहे. आज या तालुक्यात औद्योगीकरण झाले आणि उद्योगनगरी म्हणून नवी ओळख निर्माण झाली. ही ओळख अलीकडच्या काळात नावारूपाला आली असली तरी तालुक्याची खरी ओळख म्हणजे क्रांतिकारकांचा तालुका, संतांची जन्म आणि कर्मभूमी अशी आहे. वारी असो की कथा, कीर्तने, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सांस्कृतिक वारसा जपला जात आहे. आळंदी, देहू, भंडारा, भामचंद्र, राजगुरूनगर, भीमाशंकर, निमगाव तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी शासन, सामाजिक संस्था प्रयत्नशील असून तीर्थक्षेत्राची जपणूक या माध्यमातून केली जात आहे.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवे डोळा पाहू ।।१।।
होतील संतांचिया भेटी । सांगू सुखाचीया गोष्टी ।।२।।
या भावनेने कित्येक वर्षे वारकरी आळंदीत येत आषाढ, कार्तिक वारी माउलींचरणी रूजू करत आहेत. बाराव्या शतकात तत्कालीन उच्चभ्रू समाजाने बालवयातच बहिष्कृत करूनही माउलींनी जगाच्या कल्याणाची विश्वात्मक प्रार्थना याच आळंदीच्या भूमीत पसायदानाच्या माध्यमातून दिली. संत ज्ञानेश्वर आणि भावंडांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीच्या वंदनासाठी लाखो संख्येने लोक आळंदीत येतात. माउलींनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदी काठी संजीवन समाधी घेतली होती.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अभ्यासासाठी प्रतिवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी वारकरी बनण्यासाठी आळंदीत येतात. इथल्या शंभर वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून कीर्तनकार, प्रवचनकार होतात. आजही या संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्यांना शुल्क नाही. हजारो कीर्तनकार या संस्थेने घडविले आहेत. यासारख्या अन्य काही अल्प शुल्क घेऊन काम करणाऱ्या सुमारे साडेतीनशेहून अधिक संस्था आळंदीत अस्तित्वात आहेत. आळंदीमध्ये आल्यावर वारकरी माउलींची संजीवन समाधी, माउलींनी चालविलेली निर्जीव भिंत, सिद्धबेट, विश्रांतवड, विविध धर्मशाळा, संतोषी माता मंदिर आदी ठिकाणी भेट देवून दर्शन घेतात. शासनाने काही वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी तीर्थक्षेत्रासाठी खर्च केला आहे.
हे असे नित्य साक्षी । अस्थी नासती उदकी ।।
अशी इंद्रायणीची महती संत नामदेवांनी केली आहे. इंद्रायणीचा उगम मावळ तालुक्यातील कुरवंडे गावापासून होत आहे. मावळ भागातून ही नदी इंदोरी, देहू मार्गे आळंदी, तुळापूरला जावून भीमा भामाला मिळून त्रिवेणी संगम होत आहे. एकेकाळी शुद्ध असलेली इंद्रायणी आता प्रदूषणामुळे काळवंडली आहे. गावांचे शहरीकरण झाले, नागरीकरण वाढल्याने कोणावरच अंकुश राहिला नाही. परिणामी इंद्रायणीची गटारगंगा झाली. आता सरकारने इंद्रायणी सुधारणेचा कार्यक्रम हाती घेतला असून यासाठी निधीची मंजूरी दिली आहे. लवकरच इंद्रायणी संवर्धनासाठी पैसे खर्च होतील. मात्र ते काम नीट होईल का नाही यावरच इंद्रायणी शुद्धतेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
जगद्गुरू संत तुकारामांची अभंगगाथा ज्या देहू मावळ परिसरात लिहिली त्या परिसरात असणारा श्रीक्षेत्र भंडारा डोंगर म्हणजे तुकोबांचे साधनास्थान. जगद्गुरू संत तुकारामांची भक्ती, चिंतन आणि ग्रंथ संपदा या भंडारा डोंगराच्या सांनिध्यात बहरत गेली. इंद्रायणी नदीच्या पलिकडे, देहूपासून साधारण पाच किमी अंतरावर भंडारा डोंगर आहे. या डोंगरावर ज्या ठिकाणी पांडुरंगाचा चरणस्पर्श झाला तेथेच राज्यातील वारकरी, समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्था यांच्या आर्थिक मदतीने भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला होता. आज या मंदिराचे ८० टक्के काम झाले आहे. यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भित्ती-शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिरात विठ्ठल-रखुमाई, संत तुकारामांची मूर्ती आहे. भक्तांसाठी प्रदक्षिणामार्ग तयार केला जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाने डोंगरालगतची १०० एकर गायरान जमीन परिसर विकास करण्यासाठी आग्रही आहे. त्यात कॉरिडोर, भक्तनिवास, पाच किलोमीटरचा भंडारा डोंगर प्रदक्षिणामार्गाचा समावेश आहे. भंडारा डोंगराबरोबरच भामचंद्र डोंगरची ख्याती संत तुकाराम महाराज यांच्या साधना, भक्तीमार्गाची ओळख आजच्या साधकांना खुणावत आहेत. आजही या ठिकाणी आळंदीतून अनेक वारकरी विद्यार्थी केवळ गाथा पारायण, गाभा पाठांतरासाठी जाऊन अभ्यास करत आहेत.
भामचंद्र डोंगर चाकणपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांत विस्तारलेल्या खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर पांडवकालीन गुहा आहेत. याच गुहेत संत तुकाराम महाराजांनी पंधरा दिवस अनुष्ठान केल्यानंतर त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे भामचंद्र डोंगरास वारकरी संप्रदायाची मोठी पार्श्वभूमी आहे. येलवाडी येथील सुमारे १०० एकर गायरान जागा पवित्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज अध्यासन अध्यात्म केंद्र शासनाच्या खासगीकरण धोरणानुसार (पीपीपी) बांधण्यात यावे, अशी मागणी वारकऱ्यांची आहे.
पर्वतप्रेमी आणि जंगल भटकंती आवडणाऱ्यांसाठी भोरगड, शंभूचा डोंगर, कोटेश्वर, शिंगी, गडदचा डोंगर छोट्या ट्रेकिंगसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. गर्द झाडी, जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. सिसिटीव्ही कॅमेरे लावून या परिसरावर लक्ष ठेवण्यात येते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्म चतुःशताब्दी वर्षानिमित्त देहू, आळंदी, पंढरपूर आणि पालखीतळ मार्ग विकासाचा विशेष आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्यास मंत्रिमंडळांनी १३ मे २००९ मध्ये तत्त्वतः मान्यता दिली. नंतर शासन निर्णय २ जून, २००९ नुसार ४५० कोटीच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. शासन निर्णय १५ जून, २०११ नुसार ५१२.६६ कोटी रकमेच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर १२ सप्टेंबर २०१४ च्या निर्णयानुसार शिखर समितीमध्ये आढावा घेऊन रुपये १०९४.८९ कोटी रकमेच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. सुधारित आराखड्यामध्ये देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा, पंढरपूर आणि पालखी मार्ग येथील मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार १३ नोव्हेंबर २०१८ नुसार १३०३.८५ कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
भीमाशंकरचा विकास आराखडा
शासनाने भीमाशंकर विकास आराखडा माध्यमातून अंदाजे २८८ कोटी १७ लाख रुपये विकासासाठी मंजूर केले. यामध्ये ९०.४२ कोटी रुपये बसस्थानक पुनर्विकास आणि मंदिर पुनर्बांधणी, १६३.२५ कोटी रुपये वाहनतळ, प्रतीक्षालय, स्नानगृहे, शौचालये, लॉकर, दुकाने, ३३.८० कोटी रुपये भोरगिरी ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ भूसंपादन, रस्ते, कोटेश्वर मंदिर जीर्णोद्धार, ‘ट्रेकिंग ट्रेल’साठी मंजूर केले. खेड तालुक्यातील भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या २८८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास राज्यशासनाच्या उच्चाधिकारी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे भीमाशंकरचा कायापालट मोठ्या स्वरूपात हाईल. भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कार्यवाही करण्यासाठी ११८ एकर भूमीची आवश्यकता आहे. शिखर समितीच्या मान्यतेनंतर हे भूसंपादन करणार. नुकतेच राजगुरुनगर-भीमाशंकर रस्त्यासाठी निधी मंजूर आहेत.
शंकराच्या पुरातन मंदिरांचा विकास
खेड तालुक्यात शंकराची १२ पुरातन मंदिरे १२ ज्योतिर्लिंगाच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या प्रस्तावास वनपर्यटन वाढावे यासाठी वन विभागामार्फत भोरगिरीसाठी तीन कोटी, शिंगेश्वरसाठी दीड कोटी रुपये, शंभूसाठी पावणेचार कोटी, कुंडेश्वरसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर असून काही ठिकाणी कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी प्रस्ताविक आहेत.
निमगावच्या खंडोबा मंदिरासाठी जमीन
अनेकांचे कुलदैवत असलेले निमगाव खंडोबा मंदिर हे पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगरपासून आठ किमी अंतरावर आहे. छोट्या टेकडीवरील दगडी बांधकामातील मंदिर परिसर पायाभूत सुविधांपासून विकसीत करण्यात येत आहे. त्यासाठी रोपवे, अन्य पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील आध्यात्मिक, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यासाठी परिसरातली सुमारे शंभर कोटी रुपये किमतीची चोवीस एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे.
आळंदीत होतेय बहुमजली वाहनतळ
आळंदी शहरासाठी नव्याने ३२२ कोटींची सुधारित पाणीपुरवठा योजना तयार होत आहे. दोनशे कोटींचा शहर विकास आराखडा तयार केला आहे. बाह्यवळण मार्गासाठी ५८ कोटींचा प्रस्ताव मान्य केला आहे. आळंदी तीर्थक्षेत्र असल्याने वाहनतळाचा मोठा प्रश्न आहे. एसटी महामंडळाच्या पाच एकरमध्ये बहुमजली पार्किंग निर्मिती केली जात आहे. भक्त निवासासाठी ३५ कोटी एसटीपी प्रकल्पासाठी सहा कोटी रुपये मंजूर आहेत. भूसंपादनासाठी २५ कोटी रुपये स्वतंत्र मंजूर आहेत. सिद्धबेट विकासासाठी पंधरा कोटींची कामे झाली.
नदी सुधारचा फायदा ४८ गावांना
पीएमआरडीएच्या माध्यमातून इंद्रायणी सुधार योजना राज्यशासनाने हाती घेतली आहे. निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. १०५ किलोमीटरची लांबी असलेल्या इंद्रायणीचा डीपीआर ६७१ कोटींचा असून यामध्ये ६० टक्के वाटा केंद्राचा आणि राज्याकडून ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मावळ तालुक्यातील कुरवंडेगाव नागफणी येथून उगम तर तुळापूर येथे संगम आहे. ३९ ठिकाणी एसटीपी प्रकल्प आगामी काळात बांधली जाणार आहे. इंद्रायणी नदीच्या परिसरात ४८ गावे, तीन नगरपरिषदा, दोन नगर पंचायत असल्याने या गावांना इंद्रायणी नदी सुधार योजनेचा फायदा होणार आहे. याचबरोबर आळंदीतील भक्तनिवासाचे बांधकाम २५ कोटी रुपये निधीतून सुरू आहे. पाच कोटी इंद्रायणीचे घाटकाम तर ७०१ कोटीचे संतपीठ, शंभर बेडचे ट्रामाकेअर सेंटर उभारले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

