फलटण : पालिका प्रचाराचा चांगलाच वेग वाढला

फलटण : पालिका प्रचाराचा चांगलाच वेग वाढला

Published on

फलटणमध्ये ऐन थंडीत वाढला प्रचाराचा उष्मा

पालिकेच्या निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप, नेत्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, कोपरा सभांचा सपाटा

फलटण, ता. १५ : न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण पालिकेची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. त्यामुळे नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आल्याने आता प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. सर्वच पक्षांचे नेते आणि उमेदवार यांनी प्रभागातील गल्लोगल्ली जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी आणि कोपरा सभांचा सपाटा लावला आहे. दरम्यान, केलेल्या कामांचा लेखाजोखा आणि आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या कामाबाबत मुद्दे मांडले जात आहेत. त्यामुळे ऐन थंडीत प्रचाराचा उष्मा वाढला आहे.
न्यायालयीन प्रक्रियेच्या विलंबामुळे फलटण पालिकेची निवडणूक पुढे गेली होती. आता २० डिसेंबरला मतदान होणार आहे. पालिकेच्या १३ प्रभागांमधील २७ जागांसाठी ७६ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी युती आणि शिवसेना यांच्यात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी आघाडी करत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून चांगलीच रंगत आणली आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर हे आपापल्या परीने सर्व प्रभागांमध्ये दौरा करत उतरले आहेत.
दुसरीकडे भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य जिजामाता नाईक निंबाळकर, मनीषा नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी गतिमान केला आहे. उमेदवारांच्या घरोघरी भेटी, पदयात्रा दरम्यान तेच मुद्दे, तीच रिक्षाची धून, चौकातील डिजिटल प्रचार यामुळे मतदार राजा पुरताच वैतागला आहे. नगराध्यक्षांसह प्रभागातील सर्वच उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांसह विविध राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांशी संपर्क साधताना केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहेत, तसेच आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विकासकामांबाबतचे मुद्दे मांडले जात आहेत. पाणी, वीज, रस्ते, उद्योग, बेरोजगारी, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन आणि शहरातील दहशत या मुद्द्यांवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये रॅली, पदयात्रा, कोपरासभा आणि घर भेटीचा धूमधडाका सुरू आहे. प्रमुख नेतेमंडळी, उमेदवार आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

--------------------
चौकट
प्रचारात ''अर्थ'' केंद्रस्थानी
पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे चार दिवस राहिले आहेत. २० डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. ज्येष्ठ नेतेही प्रचारात उतरले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून प्रचारात निधी आणि पैसा हाच मुद्दा आणला जात असलयाचा विरोधकांचा आक्षेप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com