जानुबाईचं चांगभलं...कोकणच्या आईचं चांगभलं.... च्या गजरात जानुबाई देवीची यात्रा संपन्न.

जानुबाईचं चांगभलं...कोकणच्या आईचं चांगभलं.... च्या गजरात जानुबाई देवीची यात्रा संपन्न.
Published on

BHO26B01419
भोसे (ता. पंढरपूर) ः येथील जानुबाई देवीच्या यात्रेवेळी जानुबाई देवीच्या मिरवणुकीत सहभागी भाविक.
.......
‘जानुबाईचं चांगभलं’च्या जयघोषात यात्रा उत्साहात
पारंपरिक वाद्ये, मिरवणुका, भक्तिमय वातावरणाने भोसे दुमदुमले

भोसे (क), ता. ९ : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी जानुबाई देवीची यात्रा ‘जानुबाईचं चांगभलं...कोकणच्या आईचे चांगभलं...’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यात्रेनिमित्त गावात भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
गुरुवारी (ता ७) गायकवाड साहेब व मलिक साहेब यांना नैवेद्य दाखवून मध्यरात्री देवीची महापूजा करण्यात आली आणि यात्रेला प्रारंभ झाला. शुक्रवारी (ता. ८) सकाळी साडेदहा वाजता स्व. खटके अप्पा मित्र मंडळ, शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने, तर दुपारी तीन वाजता स्व. राजूबापू पाटील मित्र मंडळाच्या वतीने हलगी, लेझीम आणि गजीढोल यांच्या गजरात भव्य शेरण्या काढण्यात आल्या.
दिवसभर कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी हलकासा पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि भाविकांचा उत्साह अधिकच वाढला. यात्रेनिमित्त खेळणी, पाळणे, मेवा-मिठाई, स्टेशनरी आदी दुकानांनी संपूर्ण गाव गजबजून गेले होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी यात्रेचा आनंद लुटला.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. सासुरवासिनी लेकीदेखील माहेरच्या देवीचा नवस फेडण्यासाठी कुटुंबासह उपस्थित राहिल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता देवीचे हत्ती बैलगाडीत बसवून फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्य चौकात आल्यानंतर गायकवाड साहेबांचा घोडाही मिरवणुकीत सहभागी करण्यात आला.
गावोगावहून आलेल्या लेझीम मंडळे, झांज पथक, गजीढोल, नाचणारे मोर आणि बँड पथकांनी मिरवणुकीत रंगत आणली. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई तसेच यात्रा कमिटी आणि सरपंच अॅड. गणेश पाटील यांच्या नेटके नियोजनामुळे यात्रा सुरळीत आणि उत्साहात पार पडल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com