
वाहतूक बदलामुळे वाहनचालकांची ‘कोंडी’
वाहतूक बदलामुळे वाहनचालकांची ‘कोंडी’
गणेशखिंड, बाणेर रस्त्यावर वाहनांच्या दूरवर रांगा; इंधनासह वेळेचा अपव्यय
बालेवाडी, ता. १४ ः आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे सुरू असलेले मेट्रोचे काम व दोन दिवसांत सुरू होणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाचे काम या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेशखिंड व बाणेर रस्त्यावर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्याने वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या बाणेर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे या भागात अनेकदा वाहतूक कोंडी असते, पण आता बाणेर रस्त्याने पुढे आनंदऋषीजी चौक आणि परिसरात मेट्रोच्या खांबाबरोबरच दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी पोलिसांनी येथील वाहतूक चक्राकार पद्धतीने केली आहे. शिवाजीनगर, सेनापती बापट रस्त्यावरून जाणारी वाहतूक ही आनंदऋषीजी चौकातून राजभवनमार्गे औंधला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. औंध, बाणेर, पाषाणला जाणारी वाहतूक ही पाषाण मॉडर्न महाविद्यालयमार्गे मार्गस्थ केली आहे. पाषाणची वाहतूक सरळ पाषाणला जाते, तर पुढे औंध व बाणेरला जाणारी वाहतूक अभिमानश्री मार्गे सरळ पुढे जात असल्याने, तसेच अवजड वाहनेही या अरुंद रस्त्याचा वापर करत असल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अजूनच भर पडते आहे. ज्यांना या रस्त्याने विद्यापीठात जायचे आहे, त्यांना याच मार्गाने बाणेर रस्त्याने सरळ सकाळनगर, पुढे यशदाला जाऊन विद्यापीठात जावे लागते.
-----------------------
कामकाजाचे कोलमडले वेळापत्रक
पाषाण रस्त्याला लागल्यावर ग्रामीण मुख्यालयाला लागूनच एक अरुंद रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. तो अत्यंत अरुंद असल्यामुळे येथे वाहतूक कोंडीत भर पडते. औंध, बाणेर, पाषाण या तीन रस्त्यांचे वाहतूक एकाच रस्त्याने मार्गस्थ केल्यामुळे वाहनचालकांच्या समस्यांत भर पडली आहे. काही अंतर जाण्यासाठी तासन-तास कालावधी लागत असल्यामुळे कामकाजाचे वेळापत्रक कोलमडले असून, नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत
आहे.
----------------------
काल रात्री कृषी महाविद्यालयापासून बालेवाडीकडे जायला दोन तास लागले. ‘मुंगीच्या पावलाने चालणे’ असे आपण खूपदा म्हणतो, पण मुंगीच्या पावलाने गाडी चालवणे कशाला म्हणतात हे त्याच दिवशी समजले. पुणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः हैराण झालो आहे. - अमित बर्गे, स्थानिक रहिवासी, बालेवाडी
-----------------------------
शिवाजीनगर येथून बाणेरकडे येत असताना अभिमानश्री ते बाणेर फाटा हे अंतर जाण्यासाठी साधारण दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक तास लागला. वाहतूक पोलिसांनी ज्या ठिकाणी रस्ता अरुंद होतो, तेथे वाहतूक वॉर्डन किंवा पोलिसांनी प्रत्यक्ष थांबून वाहतूक सुरळीत करणे गरजेचे आहे. - मुद्रा शिरवईकर, बालेवाडी
------------------
प्रायोगिक तत्त्वावर ही वाहतूक बदल करण्यात आली आहे. नागरिकांना त्रास होतो याची कल्पना आहे, पण मेट्रो उड्डाणपुलाचे काम लवकर होण्यासाठी बदल करणे गरजेचे आहे. यासंदर्भात नागरिकांच्या काही सूचना असतील तर वाहतूक शाखेला लेखी स्वरूपामध्ये कळवाव्यात. बैठकीदरम्यान योग्य सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल.
- बाळासाहेब कोळी, पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी वाहतूक विभाग