फळा-खडूविना पूर्ण महाविद्यालयात विद्यादान!

फळा-खडूविना पूर्ण महाविद्यालयात विद्यादान!

Published on

बारामती, ता. १८ ः वर्ग मग तो शालेय असो की महाविद्यालयीन...सर्वप्रथम नजरेसमोर येतो तो फळा व खडू...प्रत्येकाच्या जीवनात वर्गातील फळा व खडू हा अविभाज्य अंग होता...काळ बदलला तसे तंत्रज्ञानही बदलले व आता हळूहळू फळ्याची जागा ‘स्मार्ट इंटरॲक्टिव्ह टच पॅनेल’ने घेतली आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील सर्व २७ वर्गांतील फळ्याची जागा ‘स्मार्ट इंटरॲक्टिव्ह टच पॅनेल’ने घेतली आहे. सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजिज पुणे यांच्या सहकार्याने विद्या प्रतिष्ठानने बदलत्या काळाशी सुसंगत राहत हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते व सिमुसॉफ्ट कंपनीचे कार्यकारी संचालक सुनील चोरे, ‘आयबीएम’चे हरी सुब्रम्हण्यम, विकरुद्दीन सुरकी, रामनाथ शानबाग, श्रीनिवास रामानुजम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रणालीचे मंगळवारी उद्‍घाटन झाले.
स्मार्ट क्लासरूम संपूर्ण महाविद्यालयातील प्रत्येक वर्गात सुरु करणारे विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे देशातील पहिलेच अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील महाविद्यालय देखील कात टाकत आहेत, हेच यावरून सिद्ध झाले आहे.

काय आहे ही प्रणाली?
- संगणक प्रणालीशी जोडलेल्या ८६ इंचाच्या या भव्य सेन्सेस इंटरॲक्टिव्ह टच पॅनेलच्या मदतीने शिक्षक मुलांना हव्या त्या बाबी सहजतेने शिकवू शकतात.
- इंजिनची माहिती द्यायची असेल तर पॅनेलवरून यू टयूबवर जात मुलांना त्याचे व्हिडिओ दाखविता येतात.
- समग्र माहिती हवी असल्यास गुगलवरून ती घेता येते, त्याचे थ्रीडी इमेज कसे दिसतील यासह अगदी प्रात्यक्षिकही यामुळे शक्य होणार आहे.
- या पॅनेलवर ज्या गोष्टी शिक्षक शिकवतील त्या थेट मुलांच्या मोबाईलवरही पाठविता येतील.
- त्याच्या नोट्स मुलांकडे सेव्ह राहतील.
- पुन्हा संदर्भ लागला तरी सहजतेने त्या दिवशीची फाइल उघडून पुन्हा त्यावर चर्चा करता येईल.

एखादा विषय समजून सांगण्यासाठी आता शिक्षकांना प्रत्येकवेळी लॅपटॉप वर्गात नेऊन तो प्रोजेक्टरला जोडून वायरिंग करावे लागणार नाही. अभियांत्रिकीच्या क्लिष्ट संकल्पना इंटरॅक्टिव्ह टच डिस्प्ले यंत्रणेद्वारे ऑडिओ व्हिडिओ आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून आता थेट वर्गातच ८६ इंची पॅनेलवर विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत. स्मार्ट क्लासरूम या संकल्पनेच्या एक पाऊल पुढे जात या अत्याधुनिक यंत्रणेत वेब कॉन्फरन्स, वेगवेगळ्या लॅबमधील, वेगवेगळ्या सिम्युलेशन सॉफ्टवेअर्सची उपलब्धता कुठल्याही क्लासरूममध्ये करून घेता येईल.
- सुनील चोरे, कार्यकारी संचालक, सिमुसॉफ्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.