

गर्दी- गोंगाटामुळेच मधमाश्या आक्रमक
तज्ज्ञांचा निष्कर्ष; ढेबेवाडी भागातील वाढत्या हल्ल्याने आग्या मोहाची पोळी चर्चेत
राजेश पाटील : सकाळ वृत्तासेवा
ढेबेवाडी, ता. १७ : विभागातील विविध गावांमध्ये अलीकडे काही दिवसांत आग्या मोहाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याने गावांच्या परिसरात झाडांवर वर्षानुवर्षे लटकणारी आग्या मोहाची पोळी चर्चेत आली आहेत. एरव्ही त्या ठिकाणी दिसणारा नागरिकांचा बिनधास्त वावरही त्यामुळे आता कमी झाला आहे. गर्दी, गोंगाट आणि धूर या कारणांमुळेच मधमाश्या आक्रमक होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, निसर्गातील महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाश्या सुरक्षित राहण्याबरोबरच लोकांनाही त्यांच्यापासून इजा पोहोचू नये, यासाठी गर्दी, गोंगाटाचे कार्यक्रम मधमाश्यांच्या वस्तीच्या परिसरात घेणे शक्यतो टाळावेत, असेही आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
ढेबेवाडी खोऱ्यात आग्या मोहाच्या मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. कधी रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमात, कधी यात्रेत, कधी लग्नात, कधी धार्मिक कार्यक्रमात असे हल्ले होऊन अनेकजण जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. गेल्या काही दिवसात मंद्रूळकोळे, पळशी येथे अशा घटना घडल्या. अनेकजण त्यामध्ये जखमी झाले. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. ग्रामीण भागात नदी व ओढ्याकाठी तसेच फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी, मोठ्या उंच झाडांवर आग्या मोहाची पोळी सहज दृष्टीला पडतात. लोकांनाही त्याबद्दल फारसे काही वेगळे वाटत नाही. कधीतरी वानरांचा उड्या मारताना धक्का लागून तर कधी कुणी दगड मारल्याने पोळ्यातील मधमाश्या उठून त्यांनी हल्ला केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, यापैकी काहीही कारण नसतानाही गेल्या काही दिवसांत अशा घटना का घडल्या? ही विचार करायला लावणारी बाब आहे. तज्ज्ञांच्या मते गर्दी, गोंगाट आणि धूर ही कारणे या घटनेमागे असल्याने लोकांनी त्यातून बोध घेऊन चुका सुधारायला पाहिजेत.
-----------------
गोंगाट, गर्दी, धूर आणि मोठ्या आवाजामुळे मधमाश्यांना असुरक्षित वाटते आणि त्या हल्ला करतात. जेथे असे कार्यक्रम होतात, तेथे अगोदर मधमाश्यांचे पोळे कुठे आहे का? हे पाहणे जरुरीचे आहे. ग्रामीण भागात अशी पोळी जाळणे, धूर करून काढून टाकणे असे चुकीचे प्रकार अवलंबले जातात. मात्र यामुळे मधमाश्यांसह अंडी, पिल्ले मरून त्यांच्या पुढच्या पिढ्या नष्ट होतात. मधमाशाच नसतील तर परागीभवन ठप्प होऊन मानवी जीवन संपून जाईल.
- डॉ. योगेश फोंडे
(संशोधक व उपजीविकातज्ज्ञ, वनक्षेत्र कोल्हापूर)
-------------------------
चुकीच्या पद्धतीने पोळी काढण्याचे प्रकार
मधमाश्या छोट्यातील छोट्या आवाजाची स्पंदने टिपतात व धोका ओळखून आक्रमक होतात. चुकीच्या पद्धतीने मधाची पोळी काढण्याचे प्रकार निसर्गाला बाधक असून, शास्त्रोक्त पद्धतीने मधाचा भाग काढून मधमाश्या व पोळ्यातील इतर घटक कसे शाबूत ठेवता येतील, याचे वन विभागाकडून प्रशिक्षणही दिले जाते, असे सांगण्यात आले.
-------------------
(फोटो)
१) DBW26B08383
ढेबेवाडी : आग्या मोहाच्या मधमाश्यांची पोळी.
२) DBW26B08382
डॉ. योगेश फोंडे
---------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.