विदेशात स्थायिक मौलानाविरोधात गुन्हा
विदेशात स्थायिक मौलानाविरोधात गुन्हा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ ः ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या मौलाना शमशूल हुडा खान याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) हवालाचा गुन्हा दाखल केला आहे. खान हा आधीपासून उत्तर प्रदेश पोलिसांच्या रडारवर आहे. विदेशातील मौलानाविरोधात ‘ईडी’कडून हवालाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कट्टरतावाद पसरवणे तसेच धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली कट्टरतावादाच्या प्रसारासाठी अर्थसाहाय्य करण्यासह इतर गुन्हे खान याच्याविरोधात दाखल आहेत. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये वास्तव्याला असलेला खान हा २००७मध्ये देश सोडून ब्रिटनला गेला होता. नंतर त्याने त्या देशाचे नागरिकत्व घेतले होते. भारत आणि विदेशातील बॅंक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे व हा पैसा त्याने इतरत्र वळविल्याचे तपास संस्थेचे म्हणणे आहे. ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्यानंतरही त्याला २०१३ ते २०१७ या काळात मौलाना म्हणून उत्तर प्रदेश सरकारकडून वेतन मिळत होते, हे विशेष.
राजा फाउंडेशन या नावाची संस्था चालवणाऱ्या खान याची सुमारे ३० कोटी रुपयांची अचल संपत्ती आढळली आहे. आझमगड आणि संत कबीर नगर येथे त्याने मदरसे उघडले होते. पोलिसांनी या मदरसांची नोंदणी रद्द केली आहे. खान याने पाकिस्तानला भेट दिली होती. तेथील अनेक कट्टरवाद्यांशी त्याचा संबंध असल्याचा व तो स्वत: दावत ए इस्लामी नावाच्या संघटनेचा सदस्य असल्याचा संशय तपास संस्थांना आहे.

