दिल्ली उच्च न्यायालयासमोर निदर्शने

दिल्ली उच्च न्यायालयासमोर निदर्शने

Published on

दिल्ली उच्च न्यायालयासमोर निदर्शने


कुलदीप सेंगरच्या जामिनाला विरोध करत आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ ः उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगर याला देण्यात आलेल्या जामिनाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयासमोर निदर्शने केली. ‘‘उच्च न्यायालयावरील आमचा विश्वास उडाला आहे. सेंगरचा जामीन रद्द झाला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. तेथेही न्याय मिळाला नाही तर देश सोडू. माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांना तत्काळ फाशी झाली पाहिजे,’’ असे पीडितेच्या आईने यावेळी सांगितले.
२०१७ मध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणात सेंगर हा मुख्य दोषी आहे. माजी आमदार असलेल्या सेंगरची या घटनेनंतर भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. आंदोलकांनी जंतर मंतरवर जाऊन आपला निषेध नोंदवावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. यानंतर कोर्टासमोर जमलेल्या आंदोलकांची पांगापांग झाली. सेंगर जामिनावर बाहेर आला तर आपली हत्या होऊ शकते, अशी भीती पीडितेने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. सुब्रह्मण्यम प्रसाद आणि न्या. हरिश वैद्यनाथन यांच्या खंडपीठाने चालू आठवड्याच्या सुरुवातीला सेंगर याचा जामीन अर्ज मंजूर केला होता. मात्र अन्य गुन्ह्यात आरोपी असल्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका झालेली नाही. जामीन दिला जात असला तरी पीडिता राहत असलेल्या ठिकाणच्या पाच किलोमीटर परिसरात जाऊ नये. जामिनाच्या काळात दिल्ली सोडू नये, दर सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, असे निर्बंध न्यायालयाने घातले होते. बलात्काराच्या प्रकरणात सेंगर याला कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेप तसेच २५ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com