मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान आणि लोकशाही धोक्यात — कॉंग्रेसाध्यक्ष खर्गे
राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात
काँग्रेसाध्यक्ष खर्गे यांचा मोदी सरकारच्या कार्यकाळावर आरोप
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २८ ः मोदी सरकारच्या कार्यकाळात घटना आणि लोकशाही धोक्यात असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी पक्षाच्या १४० व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केली. येथील काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ खर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहणाद्वारे झाला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
‘‘हरित, धवल आणि दूरसंचार क्षेत्रातील क्रांती त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि वाहन उद्योगाच्या विस्ताराचे श्रेय काँग्रेसला जाते,’’ असे प्रतिपादन खर्गे यांनी यावेळी बोलताना केले.
भाजपच्या सध्याच्या सरकारच्या काळात जल, जंगल आणि जमीन धोक्यात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘‘सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांचे अधिकार मजबूत झाले तर मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयांना जगभरात ओळख मिळाली. काँग्रेस सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या घटनात्मक संस्थांना कमजोर करण्याचे काम मागील ११ वर्षांपासून मोदी सरकार करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याने तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत आणि तिरंग्याला मानण्यास नकार दिला होता,’’ असे आरोप खर्गे यांनी यावेळी केले.
आव्हानांना तोंड देण्यास सज्ज रहा
‘‘सध्याच्या काळात आव्हाने भरपूर आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. कितीही संकटे आली तरी अखेरीस सत्याचा विजय होतो, हा महात्मा गांधींचा मंत्र डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी झाली होती.

