भारत सुरक्षेशी तडजोड करत नाही
भारत सुरक्षेशी तडजोड करत नाही
पंतप्रधान मोदी; विविध क्षेत्रात देशाची मान उंचालवल्याचा दावा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २८ ‘‘सरत्या वर्षात अशा अनेक घटना घडल्या की ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंच झाली. देशाच्या सुरक्षेपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत. विज्ञानाच्या प्रयोगशाळेपासून ते जगातील मोठ्या मंचापर्यंत भारताने आपली मजबूत छाप सोडली आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणी वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केले. या वर्षातील अखेरच्या ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी आजचा भारत स्वत:च्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करत नाही, असेही ठामपणे सांगितले.
‘‘पाकिस्तान विरोधात राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा मोदी यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूर हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचे प्रतीक बनला आहे. आजचा भारत सुरक्षेशी कोणतीही तडतोड करत नाही, हे त्यावेळी जगाने पाहिले. ही मोहीम सुरू असताना जगाच्या कानाकोपऱ्यात भारतमातेप्रतीचे प्रेम आणि भक्तीचे चित्र दिसत होते. हीच भावना ‘वंदे मातरम्’ ला दीडशे वर्षे पूर्ण झाली तेव्हा पहावयास मिळाली होती,’’ असे मोदी म्हणाले. विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचा तसेच या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कुंभ मेळ्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी केला.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुढील महिन्याच्या १२ तारखेला यंग लीडर्स डॉयलॉगचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामील होत युवकांशी संवाद साधणार असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी ‘काशी तमीळ संगमम’चा उल्लेखही केला. अँटी बायोटिक औषधांचा प्रभाव कमी होत चालला आहे, त्याबद्दल पंतप्रधानांची चिंता व्यक्त केली. अँटी बायोटिक औषधांच्या वापराच्या संदर्भात भारतात उदासीनता आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण ही औषधे घेतो, ही चुकीची बाब आहे, असे मोदी म्हणाले.

