आकृतिबंधाला मान्यता २०११ जनगणनेनुसार
फुरसुंगी, ता. ८ : महापालिकेतून बाहेर पडून नव्याने झालेल्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेचा आकृतिबंध नुकताच जाहीर झाला आहे. मात्र, यामध्ये मंजूर झालेल्या कर्मचारी संख्येने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. येथील सध्याची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाख आहे. आकृतिबंधाला मान्यता देताना २०११ची जनगणना म्हणजे ६० हजार लोकसंख्या विचारात घेतल्याने ही तफावत जाणवत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी येथील नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेतून वगळून नवीन नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सात ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली. एकंदरीत या नगर परिषदेची वाटचाल संथ गतीने होताना दिसत आहे. कर्मचारी संख्या कमी झाल्यास येथे नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढून रखडलेली कामे आणि दुरुस्तीसारखी कामेदेखील पुन्हा रखडण्याची चिंता नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक कर्मचारी उपलब्ध करावेत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
फुरसुंगी-उरुळी देवाचीमध्ये पालिका कर्मचारी संख्या
सफाई कर्मचारी : १३३
सांडपाणी विभाग : ५
पाणीपुरवठा विभाग : २४
विद्युत विभाग : ४
अभियंता : ४
एकूण : १७०
नगर परिषदेच्या आकृतिबंधात एकूण पदे : ५९.
दोन्ही गावांची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि कामांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबविणे योग्य ठरेल. कर्मचारी कमी उपलब्ध होणे अडचणीचे ठरू शकते. प्रशासकांनी भरतीप्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी.
- प्रतीक्षा बाजारे, स्थानिक महिला, उरुळी देवाची
नगर परिषदेचा स्वतंत्र कारभार सुरू करत आहोत याचा अभिमान आहे. रखडलेल्या कामांची यादी मोठी आहे. महापालिकेचे सध्या कार्यरत असणारी कर्मचारी संख्या आणि नगर परिषदेत मंजूर कर्मचारी संख्येत मोठी तफावत आहे. सध्याच्या लोकसंख्येचा आकृतिबंधात विचार होणे आवश्यक आहे. कर्मचारी कमी उपलब्ध झाल्यास कामांचे नियोजन बिघडेल. आगीतून फुफाट्यात अशी परिस्थितीत येऊ नये, अशी अपेक्षा आहे.
- संजय हरपळे, स्थानिक नागरिक, फुरसुंगी
मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया राबविणार आहोत. त्यानंतर येथील लोकसंख्या आणि कामांचा आढावा घेऊन आवश्यक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेता येतील. उपलब्ध कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांचा समतोल साधून कामे मार्गी लावणार आहोत. कोणतेही काम रखडणार नाही, याची काळजी घेणार.
- प्रसाद शिंगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, फुरसुंगी नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.