
शिवाजीनगर, ता. २९ : नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लहान गट, मध्यम गट व मोठ्या गटांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या.
या स्पर्धेतून नितीन पावळे, अरविंद सभावत, आयुष मोहतो आणि अश्विका हिंगे या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावीत राज्याचा मान उंचावला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठीही या चौघांची निवड झाली आहे. रिया चोरडिया आणि इतर दोघांनीही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीय मंडळ योग आणि आयुर्वेद प्रबोधिनीच्या संचालिका डॉ. पल्लवी कव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाचे पालक, क्रीडाप्रेमी व महाराष्ट्रीय मंडळ परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे. लवकरच राष्ट्रीय स्पर्धेसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.