
प्राचीन पंचलिंग महादेव शिवालय
जुन्नरहून ऐतिहासिक नाणेघाट व दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या व शहरालगतच्या शंकरराव बुट्टे पाटील मार्गावर प्राचीन पंचलिंग महादेव शिवालय आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे लखोजी जाधव यांचे सुभ्याचे गाव. शिवरायांनी पहिला हुंकार घेऊन, मुठीत स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ते शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात ते पहावयास मिळते. सह्याद्रीच्या श्रृंखलेतील धाकट्या भावाप्रमाणे घोळक्यात उभे असलेले मानमोडा, मांगणी व हटकेश्वर डोंगरांच्या आसमंतात ‘हर हर महादेव’च्या निनादलेल्या प्रतिध्वनींचा कानोसा घेणारे प्राचीन धाटणीचे स्थापत्य वैभव असलेले एक प्राचीन शिवालय आहे. त्रिस्तरीय शिखरे उभारणीतील पंचलिंग म्हणजे शिवाची पाच स्वयंभू लिंग रूपे असलेल्या पिंडीचे शिवालय आहे.
पंचलिंग मंदिराचे बांधकाम गाभाऱ्यात तळापासून चुना व दगडात आहे. कळसावर ब्रह्म, विष्णू, महेश, लक्ष्मी, शिव-गणपती, उतरंडीच्या स्वरूपात असलेल्या तांदळाच्या पाच पिंडी तसेच देवी-देवतांसह वाघ, सिंह, वानर या प्राण्यांची शिल्पे बैठी व उभी ठेवण असलेली आहेत. साधक, पौराणिक सैनिक लोकमूर्तीच्या डोक्यावरील टोप, मुकूट, अलंकार या भावमुद्रे-सहकलात्मक पद्धतीने साकारल्या आहेत. मंदिरावर १०१ छोटे-मोठे कळस आहेत. पूर्वमुखी मंदिर आहे. मंदिराच्या भिंतींमध्ये १९९ दीप कोनाडे आहेत. यात्रेकरूंना उतरण्यासाठी सोपा व सभामंडप शिवमंदिराच्या सुरुवातीला आहे. सभामंडप व शिवमंदिर यांच्यामध्ये दगडी पायऱ्या असलेली पुष्करणी असून दक्षिणेकडील पुरातन भुयारी विहिरीतून गोमुखाद्वारे वर्षभर पुष्करणीत जलधारा पडत असते. पुष्करणीमधील अधिकचे पाणी उत्तरेकडे मुखाजवळ भाविकांना पाय धुण्याची छोटी कुंडी आहे. कुंडीतील पाणी मंदिराच्या बाहेरच्या मोठ्या दगडी तळ्यात संचित होते. पुष्करिणी लगत दगडी चौथऱ्यावर बसलेल्या स्थितीत नंदी आहे. नंदीच्या पुढील भागात जुन्नरमधील सर्वात मोठे गणपतीची पाषाण मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशाची द्वारे ठेंगणी असून सुरुवातीला श्री गणेश व विष्णू लक्ष्मी मूर्ती आहे. गर्भगृहात पायऱ्यांनी उतरल्यावर गाभाऱ्यात पाषाणातील पाच स्वयंभू शिवलिंग एकाच पिंडीत आहेत. पिंडीच्या पश्चिमेला माता पार्वतीची मूर्ती आहे.
तांदळाची आकर्षक उतरंड
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. पहिल्या तीन अथवा चार सोमवारी तांदळाची एक आकर्षक उतरंड व पाच पिंडी लिंबाच्या आधारावर प्रतिकात्मक शंभू महादेवाच्या मुखवट्याच्या मस्तकावर शिरातून ठेवलेली असते. शेवटच्या श्रावणी सोमवारी तांदळाच्या एकावर एक पिंडी, अशा पाच उतरंडी बनवल्या जातात. श्रावणी सोमवारी पिंडीसाठी लागणारा सर्व तांदूळ देण्याचा नऊ पिढ्या फक्त बुट्टे पाटील कुटुंबीयांना मान आहे.
श्रावणात भरते यात्रा
श्रावणी सोमवारी भरणाऱ्या यात्रेसाठी व दर्शनाकरता परिसरातील व गावोगावचे भाविक गर्दी करतात. पंचलिंग मंदिराची दैनंदिन देखभाल, दिवाबत्ती तसेच संपूर्ण श्रावण महिन्यात रोजचा अभिषेक, प्रत्येक श्रावणी सोमवारी अकराशे बेल पानांचा व शेवटच्या श्रावणी सोमवारी अकरा हजार बेल पानांचा अभिषेक व एक सुवर्ण बेलपत्र व पिंडीसाठी लागणारा तांदूळ, कुस्त्यांचा आखाडा याची व्यवस्था जुन्नरचे पोलिस पाटील अनाजी धोंडजी बुट्टे पाटील ट्रस्टच्यावतीने गेल्या २०० वर्षांपासून बुट्टे पाटील यांच्या नऊ पिढ्या पाहत आहेत. यात्रेनिमित्ताने बुट्टे पाटील ट्रस्ट विजयी मल्लांना कुस्त्यांच्या आखाड्यात रोख इनाम देतात. पूर्वी मल्लांना खऱ्या जरीचे पागोटे इनाम स्वरूपात दिले जात असे. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात तूप तेलांच्या दिव्यांची आकर्षक दिपोत्सवाची पर्वणी बुट्टे पाटील कुटुंबातील सुहासिनी ऊर्मिला बुट्टे पाटील यांनी सुरू ठेवली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बुट्टे पाटील ट्रस्टच्या वतीने भक्तांना फळांचा प्रसाद वाटप करण्यात येतो.
वटवृक्षांचे संगोपन व संरक्षण
जुन्नर शहरातून पंचलिंग मंदिराकडे येणाऱ्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा १८९०मध्ये अनाजी धोंडजी बुट्टे पाटील यांनी वटवृक्ष लागवड केली. जुन्नरचे नगराध्यक्ष व तालुका लोकल बोर्ड अध्यक्ष रावबहादूर रामचंद्र अनाजी बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून वटवृक्षांचे संगोपन संरक्षण केले. शासनाने त्याबद्दल झाडांच्या हक्काची सनद रामचंद्र बुट्टे पाटील यांना दिलेली आहे. १८८५ मध्ये जेम्स चॅम्पवेल या आयसीएस अधिकाऱ्याने बॉम्बे प्रेसिडेन्सी पुणे गॅझेटमध्ये नंबर १४८ वर पंचलिंग मंदिराबाबतचा उल्लेख केला आहे.
संकलन : ॲड राजेंद्र शरद बुट्टे पाटील, बुट्टे पाटील मार्ग, कल्याण पेठ, जुन्नर
सौजन्य : हॉटेल आनंद एक्झिक्युटिव्ह, पर्यटन शिवजन्मभूमी, जुन्नर जि. पुणे मोबाईल 9960870451/9130365757,
लेख मंदिराच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर तयार करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.