अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना गरजेच्या

अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना गरजेच्या

Published on

पळसदेव, ता. २७ ः पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यात गेल्या वर्षभरात १०९ अपघातांत ३९ प्रवाशांना आपला जीव गमविला आहे. तर १२१ जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून परिणामकारक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी प्रवाशांसह वाहनचालक व्यक्त करत आहेत.
महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन एक तपाचा कालावधी उलटला आहे. यामध्ये सध्याची महामार्गावरील वाहनांची संख्या व रस्त्याची रुंदी यामध्ये तफावत आढळून येत आहे. यात अपघातांना निमंत्रण देणारी भौगोलिक ठिकाणं, वेग मर्यादेचे उल्लंघन, नशा करून बेशिस्तपणे वाहन चालविणे, अरुंद पूल यांसारख्या काही कारणांमुळे वारंवार अपघात घडतात. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात रोखण्याच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होईल.
महामार्गावर हायमास्ट दिवे बसवण्याची गरज आहे. याशिवाय पूर्वसूचना देणारे स्पष्ट आणि परावर्तित मोठे फलक लावणे आवश्यक आहे. महामार्गालगत वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत हॉटेल व टपऱ्यांना हटविण्यात यावे.

वाहतूक नियमांचे पालन
महामार्गावरून प्रवास करताना प्रामुख्याने लेनची शिस्त पाळण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे महामार्गावर वेगाची मर्यादा घालून दिलेली आहे, त्या प्रमाणे लेनची शिस्त पाळण्याची सक्ती येथे होणे गरजेचे आहे. गाव, शाळा आणि बाजारपेठ अशा आवश्यक ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रंबल स्ट्रीप्स बसवण्याबरोबर वेग मर्यादेवर कडक निर्बंध लागू करण्याची आवश्यकता आहे. रस्ता ओलांडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पाडलेले अनधिकृत दुभाजक हेही अपघातांचे मुख्य कारण आहेत. अशा दुभाजकांचा कायमचा बंदोबस्त करण्याबरोबर अतिवेगवान व बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पीड गनच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे.

पंचसुत्रीतून अपघातांना आळा
रस्त्याची रचना सुधारणे, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी, अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळवून देणे, वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, सुरक्षिततेसाठी आवश्यक कायदे व नियमांची अंमलबजावणी या पंचसुत्रीतून महामार्गावरील अपघातांना आळा घालण्याबरोबर अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यास मदत होईल.


उपाययोजना
-अरुंद पुलांचे रुंदीकरण करणे
-अपघात प्रवण क्षेत्रांत रस्त्यांची रचना बदलणे
- तीव्र चढ-उताराच्या ठिकाणी उंची व तीव्रता कमी करणे
-महत्त्वाच्या जोड रस्त्याच्या चौकात नव्याने रस्त्याची रचना
-डाळज क्र. २ येथे वाढीव लेन व सेवा रस्ता
-इंदापूर ते भिगवण दरम्यान दोन्ही बाजूने सेवा रस्ता

गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांचे प्रमाण घटले आहे. पर्यायाने मृत्युमुखी व जखमींची संख्याही कमी झाली आहे. महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे व पुणे प्रादेशिक विभागाचे पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात येत आहे. वेगवान वाहनांवर कारवाई, रस्त्यालगत वाहने उभा करण्यावर घातलेले निर्बंध व त्यांच्यावर करण्यात येणारी कारवाई, चालकांमध्ये प्रबोधन यांसारख्या काही उपक्रमामुळे अपघात कमी होण्यास मदत झाली आहे.
-सोमनाथ पडसळकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक, इंदापूर महामार्ग पोलिस केंद्र


सन २०२४ मधील अपघातांची आकडेवारी (जानेवारी ते नोव्हेंबर)
*प्राणांतिक अपघात - ४९ , मृत्युमुखी - ५९, गंभीर जखमी - १८
*गंभीर अपघात - ३८ , जखमी - ६७
*किरकोळ अपघात - ५० , जखमी -९७
*बिगर दुखापत अपघात - १७
*एकूण अपघात - १५४

सन २०२५ मधील अपघातांची आकडेवारी (जानेवारी ते नोव्हेंबर)
*प्राणांतिक अपघात - ३८ , मृत्युमुखी - ३९, गंभीर जखमी - ३२
*गंभीर अपघात - २९ , जखमी - ३०
*किरकोळ अपघात - २६ , जखमी - ५९
*बिगर दुखापत अपघात - १६
*एकूण अपघात - १०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com