“सर्व्हर डाऊन”मुळे नागरिक हैराण; दाखल्यांसाठी तहसील-सेतू केंद्रांवर हेलपाटे शैक्षणिक प्रवेशाच्या तोंडावर विद्यार्थ्यांची चिंता वाढली; ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल

“सर्व्हर डाऊन”मुळे नागरिक हैराण; दाखल्यांसाठी तहसील-सेतू केंद्रांवर हेलपाटे शैक्षणिक प्रवेशाच्या तोंडावर विद्यार्थ्यांची चिंता वाढली; ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल
Published on

विद्यार्थ्यांना मिळेनात दाखले

सर्व्हर डाऊनचा परिणाम; नागरिकांना माराव्या लागतात चकरा

खटाव, ता. ८ : राज्य शासनाने प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाइन केल्या आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून ‘आपले सरकार’ आणि ‘महाऑनलाइन’ या मुख्य पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक दाखले मिळत नसल्याने नागरिकांना तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रांवर वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिलपासून ‘महाऑनलाइन’ व ‘आपले सरकार’ या संकेतस्थळांच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमीलेअर, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यासारख्या महत्त्वाच्या सेवांसाठी नवीन अर्ज दाखल करणे अशक्य झाले आहे. अनेक नागरिकांनी यापूर्वीच अर्ज सादर केले असून, त्यांचे दाखले मंजूर झालेले असतानाही सर्व्हर बंद असल्यामुळे ते डाऊनलोड करता येत नाहीत.
दहावी व बारावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू होते. विद्यार्थ्यांना विविध शासकीय व शैक्षणिक कागदपत्रांची आवश्यकता आहे. मात्र, दाखले उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि पालक रोज सेतू केंद्रांवर येत असून, ‘सर्व्हर सुरू होईल’, या आशेवर तासन्‌तास प्रतीक्षा करत आहेत.
दरम्यान, सेतू केंद्र चालक आणि कर्मचाऱ्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ‘पोर्टल अपडेशन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्व्हर बंद असल्याने आम्हीही हतबल आहोत,’ अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी दिली. तांत्रिक अडचणीमुळे दिवसभरात एकही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेकांना रोजगार सोडून तहसील कार्यालयात यावे लागत असून, आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

दाखले ऑफलाइनने द्यावेत
------------
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा विचार करून आवश्यक दाखले ऑफलाइन पद्धतीने देण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com