धारवाडच्या कलाकाराने साकारली ‘दगडूशेठ’ गणेशमूर्ती

धारवाडच्या कलाकाराने साकारली ‘दगडूशेठ’ गणेशमूर्ती

Published on

सतीश जाधव : सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. ३१ : पुण्यातील प्रसिद्ध गणपती म्हणून देशभर ख्याती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची मूर्ती धारवाड (कर्नाटक) येथील कलाकाराने साकारली आहे. दिवंगत मूर्तिकार नागलिंगाचार्य शंकराप्पाचार्य शिल्पीपंडित असे त्यांचे नाव असून प्लॅटर ऑफ पॅरिसपासून अवघ्या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी ही मूर्ती बनविली आहे. गणेशोत्सवात त्यांचा मुलगा आनंद शिल्पीपंडित व कुटुंबीयांना या श्रीमूर्तीच्या पूजनाचा मान दिला जातो.

मूर्तिकार नागलिंगाचार्य यांना १९६७ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीची ऑर्डर मिळाली होती. या मूर्तीची स्थापना २७ ऑगस्ट १९६८ रोजी केली. नागलिंगाचार्य यांचे मित्र व ससून रुग्णालयातील डॉ. परांजपे यांनी त्यांना मूर्ती बनविण्याची ऑर्डर दिली. हडपसरमधील आनंद शिल्पकला निकेतनच्या स्टुडिओत त्यांनी मूर्ती तयार केली. प्रारंभी, दगडूशेठ हलवाई गणपतीचे चित्र तयार केले. मंडळाला ते चित्र आवडले. त्यानंतर मातीची एक फुटाची मूर्ती तयार करून दाखविली. त्यानंतर मूळ मूर्ती तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली. नागलिंगाचार्य यांनी वर्षभरात ती मूर्ती बनवून दिली. देशभरात अशी एकमेव मूर्ती आहे की तिला काचेचे डोळे हाताने तयार करून बसविले आहेत. मुखवट्यावर कीर्तिमुख बसविले आहे. तसेच सोंडीवर नक्षीकाम केलेले आहे. सध्याची मूर्ती चार फुटांची असून त्या वेळी त्या मूर्तीत श्री गणेश यंत्र, श्री विश्‍वकर्मा यंत्र, गायत्री यंत्र, कुबेर यंत्र व महालक्ष्मी यंत्र ही पाच यंत्रे बसविली आहेत.

मूर्तिकार नागलिंगाचार्य हे मूळचे होंबळ (गदग) येथील होते. त्यानंतर ते धारवाड व पुण्याला स्थायिक झाले. त्यांचा मुलगा आनंद शिल्पीपंडित हेही वडिलांचे काम पुढे चालवत आहेत. आनंद यांना गणेशोत्सवात आरतीचा मान दिला जातो. तसेच दरवर्षी मूर्तिकार म्हणून २५ हजारांची मदतही दिली जाते. याचबरोबर दगडूशेठसह पुण्यातील दशभुजा गणपती, जिलब्या मारुती गणपती, निंबाळकर तालीम गणपती, विजय टॉकीज गजानन मंडळ, लक्ष्मी रस्ता गरुड गणपती, मार्केट यार्ड शारदा गणपती व माती गणपती या आठ मंडळांच्या मूर्ती बनविल्या आहेत. या गणपतींना गणेश यंत्र बसविले आहे. सध्या दगडूशेठ मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, खजिनदार महेश सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार काम सुरू आहे.

कर्नाटक सरकारकडून गौरव
नागलिंगाचार्य यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा कर्नाटक सरकारकडून गौरव करण्यात आला आहे. कर्नाटक राज्य ललित कला ॲकॅडमी पुरस्कार, शिल्पकला ॲकॅडमी पुरस्कार, जखनाचार्य पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानही करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा आनंद शिल्पीपंडित यांच्याकडून शिवगंगानगर धारवाड येथे आनंद शिल्पकला निकेतन चालविले जाते. त्या ठिकाणी काळ्या पाषाणाच्या, पंचधातूच्या, तांब्याच्या, पितळाच्या व इतर धातूंच्या मूर्ती बनविल्या जातात.

माझ्या वडिलांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाईची मूर्ती बनविली आहे. वडिलांच्या कामाची दखल घेत कर्नाटक सरकारने आम्हाला गौरविले आहे.
- आनंद शिल्पीपंडित, शिल्पकार
86904


86901
पुणे : सध्याची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची मूर्ती.
86902
पुणे : मूर्ती बनविताना मूर्तिकार नागलिंगाचार्य शंकराप्पाचार्य शिल्पीपंडित.
86903
दिवंगत नागलिंगाचार्य शिल्पीपंडित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com