

भालेघर घटनेची चौकशी करा
उपसभापती गोरख महाडिक यांचे आदेश; जावळी पंचायत समितीची मासिक सभा
कास, ता. ९ ः भालेघर येथे एका खासगी कंपाऊंडला विजेचा प्रवाह सोडण्यात आल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी सूचना उपसभापती गोरख महाडिक यांनी दिली.
जावळी पंचायत समितीची मासिक सभा उपसभापती गोरख महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य आतिश कदम, सदस्या चारुशीला पवार, शिल्पा शिंदे, सुनीता दुंदळे, अतिरिक्त गटविकास अधिकारी संतोष पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम २०२६ साठी प्रमाणित बियाणे वाटप ऑनलाइन सुरू झाल्याची माहिती दिली. भुईमूग बियाणे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी १६ प्रकल्प मंजूर झाले असून, मेअखेरीस गावपातळीवर पाहणी करून अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. घोटेघर येथे एआयच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी शेतीचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. एसटी विभागाच्या आढाव्यात केडांबे येथे बससेवा बंद असल्याबाबत तक्रारी करण्यात आल्या. रस्त्यावर खासगी वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावर ‘बोंडारवाडीला गाड्या जात असतील, तर केडांबे येथेही सेवा सुरू ठेवावी,’ अशा सूचना कदम यांनी दिल्या.
कुरळोशी रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सदस्य आतिश कदम यांनी सांगत संबंधित रस्ता तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. वन विभागाच्या आढाव्यात वरोशी-वाहिटे परिसरातील झाडतोडीनंतर वृक्षारोपणाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाईल, अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण रुग्णालय सोमर्डी येथे अनेक पदे रिक्त असल्याची बाब सभेत मांडण्यात आली. नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रिक्त पदांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव घ्यावा, अशी मागणी सदस्य आतिश कदम यांनी केली. ‘या महिन्यात बदली झाली नाही, तर पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार,’ असा इशाराही त्यांनी दिला. पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यात ६० गावे व सहा वाड्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. करंडी चिकणवाडी येथे लांब अंतरावरून झऱ्याचे पाणी आणण्याऐवजी विंधन विहीर घेणे अधिक उपयुक्त ठरेल, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. त्यास सदस्या सुनीता दुंदळे यांनी संमती दर्शवली. गटविकास अधिकारी संतोष पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.