लोणावळ्यात पर्यटकांचा ओघ सुरूच
लोणावळा, ता. २८ : नववर्ष स्वागत, वीकेंड सुट्या असा योग आल्याने पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा असून वाहतूक संथ गतीने सुरू होती. तर, नियोजन करताना पोलिसांची धावपळ दिसून आली.
लोणावळा, खंडाळा, भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, कार्ला-भाजे लेणी आदी स्थळांवर पर्यटकांची वर्दळ होती. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही कोंडीची निर्माण झाली. महामार्गावरील वाढलेल्या वाहनसंख्येमुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक मंदावली होती. विशेषतः दस्तुरी, बोरघाट पोलिस मदत केंद्र, अमृतांजन पूल, लोणावळा एक्झिटजवळ, खंडाळा घाट परिसरात तसेच शहराच्या प्रवेश मार्गांवर पोलिसांना वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागले. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गडावर जाण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने कार्ला फाटा ते विरगाव दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या.
काही ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रतीक्षा करावी. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिस व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पर्यटकांमुळे हॉटेल, रिसॉर्टवर वर्दळ पाहायला मिळत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बंदोबस्तात वाढ
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन रस्त्यावर न उभे करता निर्धारित पार्किंगमध्येच उभे करण्याचे आवाहन पेालिसांनी केले आहे.

